![](https://epunemetro.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-06-at-6.46.27-PM.jpeg)
पुणे, प्रतिनिधी –
लाडकी बहिण योजना अमलात आणली त्यावेळेस आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करून योजना फसवी असल्याचे सांगण्यात आले. मात्र ,अडीच कोटी महिलांच्या खात्यात आम्ही आतापर्यंत पैसे भरले आहेत. महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात असून त्यांनी न्यायालयात देखील दाद मागून योजना म्हणजे पैशाचा चुरडा असल्याचे सांगितले. परंतु आम्ही ही योजना बंद होऊ दिली नाही आणि भविष्यात देखील योजना बंद करणार नाही. सरकार जनतेचे असून हक्काच्या आमदार माधुरी मिसाळ पुन्हा विधानसभेत पाहिजे आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
पर्वती मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण शाळेसमाेरील रस्त्यावर आयाेजन बुधवारी करण्यात आले हाेते त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, माजी मंत्री आमदार पंकजा मुंडे,शहराध्यक्ष धीरज घाटे,आमदार माधुरी मिसाळ,माजी मंत्री विजय शिवतारे,अमित गोरखे, दीपक मानकर, नाना भानगिरे, संजय सोनवणे, जगदीश मुळीक, विष्णू कसबे, सरस्वती शेंडगे ,संदीप खर्डेकर, सुशील मेंगडे,प्रवीण चोरबोले , आबा शिळीमकर, संतोष नागरे , हर्षदा फरांदे, सुनील कुरूमकर, श्रीकांत पुजारी, महेश वाबळे, बाबा मिसाळ ,डॉ. सुनिता मोरे ,प्रशांत दिवेकर ,अनिरुद्ध भोसले उपस्थित हाेते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांच्या कार्य अहवाल प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
फडणवीस म्हणाले, पुण्यात प्रचाराची सुरवात करावी असा प्रस्ताव माझ्या समोर आला त्यावेळी पर्वती मतदारसंघात प्रचार नारळ फोडण्याचे ठरवले. माधुरी मिसाळ यांचा चौथा विजय रेकॉर्ड ब्रेक असेल. एसआरए बाबत जी नियमावली तयार झाली त्याचे श्रेय मिसाळ यांना आहे. एफएसआय वाढवून देण्यासाठी त्यांनी काम केले. त्यातून २० हजार घराची निर्मिती याभागात होत असून गरिबांना ३५० स्क्वेअर फूट ऐवजी ४७० स्क्वेअर फूट मोठे घर उपलब्ध होत आहे. मिसाळ यांना विविध गोष्टीची जाण असून दूरदृष्टी आहे. पुणे बदलत असून मेट्रो आधीच सुरू झाली पाहिजे होती. आघाडी सरकार हे केवळ घोषणा सरकार होते पण आमचे सरकार गतिमान आहे. देशात सर्वात वेगाने तयार झालेली पुणे मेट्रो आहे. स्वारगेट येथे मल्टी मॉडेल हब तयार करण्याची कल्पना देखील त्यांची आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जोडणारा देशातील सर्वाधिक अत्याधुनिक हब हा असणार आहे. स्वारगेट ते कात्रज आणि खडकवासला ते खराडी मेट्रो प्रकल्पास तातडीने मंजुरी देण्यात आली. पुण्यातील सांडपाणीसाठी दोन हजार कोटी रुपयांचा एसटीपी प्रकल्प राबवण्याचे ठरवले त्यातून नदी प्रदूषण रोखले जाणार आहे. मुळा मुठा नदीचे जुने स्वरूप पुन्हा लोकांना पाहवयास मिळेल. पुण्यात सर्वाधिक समस्या वाहतूक कोंडी आहे. त्यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च करून रिंग रोड तयार करण्यात येत आहे. एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते पण येथील वाहतूक कोंडी पाहून त्या घाबरतात. त्यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्री यांचे पुढाकारातून ५४ हजार कोटींचे रस्ते निर्माण केले जाणार आहे. बदलत्या पुण्यात पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ यांनी वेगवेगळी विकासकामे केली आहे. त्यामुळे एखादा लोकप्रतिनिधी कसा असावा हे त्यांच्याकडे पाहून समजते. महिलांना समाजात केंद्र स्थानी आणले पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्न पाहिले. त्यासाठी सक्षमता करण्यासाठी विविध योजना आणल्या गेल्या आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मोठ्या संख्येने लोक सभेला आले असून हा प्रतिसाद पाहून ज्याच्या सभेला तुम्ही आले आहे त्यांना निवडून देण्याची जनतेची इच्छा दिसून येत आहे. ही प्रचार सभा नसून विजयी सभा आहे. सन २००९ मध्ये माधुरी मिसाळ यांचे तिकीट जाहीर होईपर्यंत स्व.गोपीनाथ मुंडे आनंदी झाले नव्हते कारण सतीश मिसाळ हे त्यांचे देखील कुटुंब होते. मतदारसंघातील सरकारच्या योजना मी सांगणार नाही पण मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी माधुरी मिसाळ यांनी प्रयत्न केले आहे. त्यांचे कोणते काम कधीच अडवले जात नाही. केवळ आमदार होऊन विकास होऊ शकत नाही त्यासाठी राज्यात सत्ता येणे आवश्यक असते. २०१९ मध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप निवडून आला पण थोडक्यात सत्ता गेली आहे.
मोहोळ म्हणाले, पुन्हा एकदा पार्वती करानी ठरवले हट्रिक झाली असुन आता चौकार मारण्याची वेळ आली आहे. शहरात अनेक विकास कामे आलेली आहे. देशात प्रगतीच्या दृष्टीने महाराष्ट्र वेगाने विकसित होत आहे. विकास कामे होताना दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य लोकांची कामे राज्य सरकारकडून होत आहे. पर्वती मतदारसंघात विकासाचे प्रचंड काम माधुरी मिसाळ यांनी केले आहे .त्यांना मागील वेळी ३० हजारांचे मताधिक्य होते, आता एक लाख मताधिक्याने मिसाळ यांना निवडून आणण्याचा संकल्प करा. पुण्यातील सर्व जागा महायुती जिंकेल असा मला विश्वास आहे.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, आज आपल्या पुणे शहरात पहिली सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. १५ वर्षं पक्षाने मला संधी दिली असून पक्षाने मला पुन्हा उमेदवारी दिली. पक्षाचा विश्वास मी सार्थ ठरवला आणि राज्यात पुन्हा युती सरकार येण्यासाठी पर्वती मधील मतदारसंघ एक असेल याची ग्वाही देते. लोकांच्या दैंनदिन गरजा समस्या सोडवण्यासोबत सत्ता नसतानाही दुप्पट कामे केली. मतदारसंघ संमिश्र असून वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात त्यांच्यासाठी ४०० प्रकारची कामे सध्या सुरू आहे.राज्यात प्रथमच मल्टी मॉडेल हब स्वारगेट येथे उभारण्यासाठी कल्पना मांडली आणि त्याला निधी कोणती कमतरता सरकारने पडू दिली नाही. कला संस्कृती जपण्यासाठी कलाग्राम प्रथम मला सुरू करता आले. एसआरएचा पहिला ४७० स्क्वेअर फूट घरांचा प्रकल्प मला मतदारसंघात सुरू करता आला आहे. मतदार यांना माझ्या कामाची कल्पना असून ते पुन्हा एकदा गतिमान, कार्यक्षम महायुतीला साथ देतील.सर्वांना सांभाळून घेणारे नेते कसे असावे हे भाजप मध्ये पाहवयास मिळते. लाडकी बहिण योजना बद्दल अभिमानाने महिला माझ्याशी बोलत आहे.