भाजपच्या सरकारच्या काळात कँटोन्मेंटचा विकास ठप्प झाला आहे. कँटोन्मेंटच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे आहे. कँटोन्मेंटच्या विकासासाठी जनतेने रमेश बागवे यांच्या पाठीशी राहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केले.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौकातील मुख्य निवडणूक कचेरीचे उद्घाटन बाळासाहेब थोरात आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, उमेदवार रमेश बागवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, जैनब बागवे, माजी नगरसेवक अविनाश बागवे तसेच अजित दरेकर , अण्णा थोरात, आरिफ बागवान, संगीता तिवारी, विनोद मथुरावाला, संगीता पवार, मिलिंद अहिरे, जयंत किराड , भगवानराव वैराट, भीमराव पाटोळे, प्रसाद केदारी, रफीक शेख, करण मखवानी, जयकुमार राघवाचारी, राजाभाऊ चव्हाण, पोपट गायकवाड, रमेश अय्यर, विकास कांबळे, रशीद खिजर, मोहसीन नगरवाला, अतुल गोंदकर, प्रतीक कांबळे, सुरेश मखवाना यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आप, तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन करून विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.
महायुतीच्या सरकारमुळे महागाई वाढली आहे. ईडीचा धाक दाखवून सत्तेत आलेले हे सरकार बदलणे काळाची गरज आहे. कँटोन्मेंटचा रखडलेला विकास केवळ महाविकास आघाडी करू शकते. या भागाच्या विकासासाठी जनतेने रमेशदादांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी करावे, असे आवाहन सुळे यांनी केले.
कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत विकास ठप्प झाला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही भाजपच्या दोन आमदारांना दहा वर्षांत विकासनिधी आणता आला नाही. भाजपच्या माजी आमदारांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात आणि सध्याच्या आमदारांनी गेल्या पाच वर्षांत कँटोन्मेंटच्या जनतेसाठी काहीच काम केले नाही. त्यांनी केवळ स्वत:चा विकास केला आणि जाहिरातबाजी केली. कँटोन्मेंटच्या विकासाठी यंदा बदल गरजेचा आहे. कँटोन्मेंटला पुन्हा वैभवाचे दिवस आणायचे असतील तर महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे. कँटोन्मेंट मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही रमेश बागवे यांनी दिली.