पुणे, : निवडणूक प्रक्रियेत मतमोजणी हा शेवटचा आणि महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपसांत समन्वय ठेऊन सोपविण्यात आलेली जबाबदारी अचूक, पारदर्शक वातावरणात तसेच जबाबदारीने पार पाडावी, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रशिक्षण आज संपन्न झाले, त्यावेळी श्री. पवार बोलत होते. या प्रशिक्षण सत्रास सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, किशोर ननवरे यांच्यासह संबंधित कक्षांचे समन्वय अधिकारी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा निवडणूकीची मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे पार पडणार आहे. त्या अनुषंगाने सर्व व्यवस्था पूर्ण झाली असून प्रत्यक्ष मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा अंतिम टप्पाही आज पूर्ण झाला. मतमोजणीसाठी सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतमोजणीबाबतचे सविस्तर प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम यांनी दिले.
मतमोजणी प्रक्रिया पार पाडताना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी उपस्थितांना देण्यात आल्या.मतमोजणीबाबतच्या तांत्रिक बाबी, विहीत नमुन्यांची माहिती, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी तसेच अधिकृत माध्यम प्रतिनिधींना थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येईल. निवडणूक मतमोजणीसाठी प्राधिकृत केलेल्या निवडणूक कार्यालयाने दिलेले ओळखपत्र संबंधितांनी प्रवेश करतेवेळी धारण करणे आवश्यक आहे. १५० मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधीत करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिका तसेच आपत्कालीन विषयक सर्व यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सर्व सुविधांसह स्वतंत्र माध्यम कक्ष तयार करण्यात आला आहे. परिसरात सीसीटीव्ही यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच इतर आवश्यक सुविधा याठिकाणी असणार आहेत, असे श्री. पवार यांनी कळविले आहे.