Spread the love

 

माऊली महाराज कदम यांचे भावस्पर्शी कीर्तन

 

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरूड परिसरातील दिंड्या आणि भजनी मंडळांसाठी संत पूजन व वारी साहित्य वाटप सोहळा राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे भक्तिभावात व उत्साहात पार पडला.

हा सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि गिरीश खत्री (अध्यक्ष, शिवस्व प्रतिष्ठान) यांच्या संयोजनात संपन्न झाला. कार्यक्रमात वारकऱ्यांना वारीच्या प्रवासात उपयुक्त ठरणाऱ्या टेंट, स्लीपिंग बॅग, टाळ, ताडपत्री, सतरंज्या, प्रवासी बॅग यांचे वाटप करण्यात आले.

मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी या वेळी भावना व्यक्त करताना सांगितले, “अशा प्रकारच्या साधनेतून एक वेगळ्या प्रकारचा अध्यात्मिक आनंद मिळतो. आपले संत ‘देण्यातच आनंद असतो’ असे सांगून गेले, आणि आजच्या कार्यक्रमातून तो आनंद अनुभवल्यासारखं वाटतं. आयुष्यभर साधना करणाऱ्या संतांचे पाद्यपूजन करण्याचा योग हा पूर्वपुण्याईमुळेच मिळतो, असे मी मानतो.”

यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की,“२१ जून रोजी योगदिनाच्या दिवशी, दिंड्या पुण्यात मुक्कामी असताना सामूहिक योगासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.”

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ह.भ.प. माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांचे प्रभावी कीर्तन ठरले. त्यांनी आपल्या कीर्तनातून वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व उलगडून सांगितले.“वारी म्हणजे फक्त चालणं नाही, ती अंतःकरणात घडणारी भक्तीची स्फुरण देणारी यात्रा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी बोलताना संयोजक गिरीश खत्री म्हणाले,“या कार्यक्रमाचा उद्देश समाजाला चांगली दिशा देणाऱ्या संतांचे पाद्यपूजन व्हावे हा आहे. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष असून, यंदाही वारकऱ्यांसाठी उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आले. आम्ही हे सर्व मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या पाठबळामुळेच करू शकलो. ते आमच्या कायम पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, हे आम्हा सर्वांसाठी मोठा आधार आहे.”

 

कार्यक्रमास ह.भ.प. भाऊ महाराज परांडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, तसेच पंढरपूर, देहू, आळंदी आदी देवस्थानांचे प्रमुख प्रतिनिधी, कोथरूडमधील विविध भजनी मंडळे, दिंड्यांचे प्रमुख आणि मोठ्या संख्येने वैष्णव भक्त उपस्थित होते. संपूर्ण परिसरात विठुनामाचा जयघोष आणि भक्तिरसाचं वातावरण अनुभवायला मिळालं.