
कोथरुड मधील मिसिंग लिंक पूर्ण होईपर्यंत भूतासारखा मागे लागेन!
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कोथरुड मधील मिसिंग लिंकच्या कार्यवाहीचा आढावा
पावसाळा संपेपर्यंत कोथरुडमधील मिसिंग लिंकसाठी जमीन अधिग्रहण कालबद्ध कार्यक्रम राबवून पूर्ण करा, अशा सूचना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. तसेच, मिसिंग लिंकचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत भूतासारखा पाठपुरावा करेन, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.
कोथरुड मिसिंग लिंकबाबत ना. पाटील यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर कुमार आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, भूसंपादन आणि मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वसुंधरा बारवे आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला मिसिंग लिंकचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा ना. पाटील यांच्या समोर मांडला. यामध्ये एरंडवणे रजपूत वाटभट्टीचे रूंदीकरण, एकलव्य महाविद्यालय येथून चांदणी चौक महामार्गाला जोडणारा रस्त्याचे जमीन अधिग्रहण झाले असून, पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम सुरू होईल, अशी माहिती दिली.
कसपटे वस्ती, भीमनगर वसाहत, कर्वेनगर मधील शिवणे खराडी रस्ता, बाणेर-बालेवाडी भागातील मिसिंग लिंकबाबत काय कार्यवाही झाली, असा सवाल मंत्री पाटील यांनी बैठकीत अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. त्यावर सदर भागातील जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर सदर काम पावसाळ्यापूर्वी जलदगतीने कालबद्ध पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या. तसेच, मिसिंग लिंकचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत भूतासारखा पाठपुरावा करेन, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.