पुणे, दि. १०: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २१४-पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात महिला मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र, अपंग मतदान केंद्र, युनिक मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, पर्दानशीन मतदान केंद्र व निगेटिव्ह मतदान केंद्र अशी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कळविली आहे.
विशेष मतदान केंद्रांतर्गत पुणे कॅन्टोन्मेंट मधील मतदान केंद्र क्रमांक २०८- आझम कॅम्पसचे पब्लिक स्कूल, भवानी पेठ येथील मतदान केंद्र क्रमांक १७८ ते १९४ मधील बी.टी.शहाणी नवीन हिंद हायस्कूल, मनपा शाळा क्रमांक ८६, वीर लहुजी वस्ताद विद्यामंदिर, शासकीय उर्दू अध्यापिका विद्यालय ३८४, गोल्डन ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, गुरुनानक नगर तसेच हाजी गुलाम मोहम्मद उर्दू प्राथमिक स्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक १९५ ते १९७ या ठिकाणी पर्दानशीन मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विद्यालय येथे दिव्यांग, मंगलदास रोड येथे नौरोसजी वाडिया कॉलेज येथे युवा संचलित, सोमवार पेठ येथील रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे आबासाहेब अत्रे इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी महिला संचलित, भवानी पेठ येथील मनपा शाळा क्रमांक ८६, वीर लहुजी वस्ताद विद्यामंदिर येथे निगेटिव्ह बूथ, अल्पबचत भवन येथे उत्तरेकडील ग्रीन रूम क्वीन्स गार्डन येथे आदर्श मतदान केंद्र तसेच नाना पेठ येथील मुलींची महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल या ठिकाणी युनिक मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात एकूण २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण २ लाख ९५ हजार ३८२ मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख ४९ हजार ४२२ पुरुष, तर १ लाख ४५ हजार ९२६ महिला मतदार तसेच ३४ तृतीयपंथी मतदार आहेत.या मतदार संघात एकूण ७३ इमारतींमध्ये एकुण २७४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. परिसरातील ५ मतदान केंद्र सोसायट्यांमध्ये स्थापन करण्यात आले आहेत. एका मतदान केंद्रावर सरासरी १ हजार ७८ इतकी मतदार संख्या आहे. यातील सर्व केंद्रांवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, असेही श्री. भंडारे यांनी कळविले आहे.