Spread the love

पुणे रेल्वे स्थानका वर येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास…सुरक्षा देखील “रामभरोसे”….

संदीप खर्डेकर यांची पोलिसांकडे वाहतूक नियंत्रणाची मागणी

पुणे, : पुणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या अभावामुळे प्रवाशांचा संताप वाढला आहे. भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी यासंदर्भात मंडल रेल्वे प्रबंधक (डीआरएम) मा. राजेश वर्मा आणि पुणे पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांना निवेदन दिले आहे.

खर्डेकर यांनी 6 मे रोजी नागपूरहून पुण्यात आगमन करताना आलेल्या अनुभवावरून रेल्वे स्थानकावरील परिस्थितीचे वर्णन केले. त्यांनी नमूद केले की:

  1. रेल्वे स्थानकाच्या पोर्च आणि प्लॅटफॉर्म परिसरात प्रचंड गर्दी होती, जेथे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती.
  2. स्थानक परिसरात रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचा अंमल असून वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
  3. मुख्य दरवाजा बंद ठेवण्यात आला असून फक्त दोन छोटे दरवाजे उघडले आहेत, त्यामुळे आत-बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना धक्काबुक्कीला सामोरे जावे लागत आहे.
  4. सुरक्षा तपासणीही अत्यंत ढिसाळ असून बॅग स्कॅनर वापरात नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

खर्डेकर यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. “आजदेखील हीच स्थिती असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन व पोलीस विभाग यांच्यात समन्वय होणे गरजेचे असल्याचे जाणकार सांगत आहेत.