Spread the love

-भारतीय प्रदूषण नियंत्रण संघ आणि स्वर्ण लता मदरसन ट्रस्टचा संयुक्त प्रकल्प उपक्रम

पुणे, 28 मार्च
भारतीय प्रदूषण नियंत्रण संघ अर्थात आयपीसीएद्वारे पुण्यात राबविण्यात आलेल्या एस.ओ.आर.टी. प्रकल्पाच्या (कचऱ्याचा पुनर्वापर आणि प्रक्रिया वर्गीकरण प्रकल्प) दुसऱ्या टप्प्याचा समारोप आणि सत्कार समारंभ संपन्न झाला. हा प्रकल्प घरगुती कचऱ्याचे सामुदायिकरित्या योग्य व्यवस्थापन आणि वर्गीकरण यांना प्रोत्साहन देतो. या उपक्रमाअंतर्गत सेंद्रिय कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर करून डंपिंग ग्राउंडवरील भार कमी केला जातो.
एस.ओ.आर.टी. प्रकल्प हा स्वर्ण लता मदरसन ट्रस्ट (एसएलएमटीटी) च्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमाचा भाग असून आयपीसीएद्वारे तो राबवला जात आहे.
गेल्या दोन वर्षांत एस.ओ.आर.टी. प्रकल्प पुण्यातील विविध ठिकाणी यशस्वीपणे अंमलात आणण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 4,40,104 किलो ओल्या कचऱ्याचे प्रक्रिया करून 49,770 किलो खत तयार करण्यात आले असून त्यामुळे डंपिंग ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा रोखला गेला आहे.
हा प्रकल्प मुख्यतः गृहनिर्माण सोसायट्या आणि संस्थात्मक क्षेत्रांमध्ये 300 हून अधिक एअरबिन कंपोस्टर्सच्या साहाय्याने राबवला गेला. यात ठोस कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन, कचऱ्याचे मूळ स्तरावर वर्गीकरण, उच्च-गुणवत्तेचे खत उत्पादन आणि रहिवासी व इतर भागधारकांमध्ये सकारात्मक बदल घडविण्यावर भर देण्यात आला.
या उपक्रमासाठी वापरण्यात येणारे एअरबिन कंपोस्टर्स कोणत्याही ऊर्जेशिवाय कार्यरत राहतात आणि कार्यक्षम, दुर्गंधीमुक्त कंपोस्टिंग सुनिश्चित करतात. प्रशिक्षित ऑपरेटरद्वारे व्यवस्थापित केलेले हे कंपोस्टर्स 40-45 दिवसांत कंपोस्ट तयार करतात आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतात.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) झोन-एचचे सहाय्यक आरोग्य अधिकारी श्री. अंकुश जिटे, झोन-एचे सहाय्यक आरोग्य अधिकारी श्री. राजू साबळे आणि पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी महासंघाच्या मुख्य प्रवर्तक श्रीमती किरण वडगमे यांच्या समारंभातील उपस्थितीने शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या समस्येसाठी गरजेचे असलेल्या सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) झोन-सीचे झोनल अधिकारी श्री. अजिंक्य येळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “कचऱ्याचे मूळ स्थितीतच वर्गीकरण आणि व्यवस्थापनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
‘काय फरक पडतो?’ या कचरा व्यवस्थापन आणि वर्गीकरण या संकल्पनेवर आधारित ‘कला साम्राज्य, पुणे’ या संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेला नाट्यप्रयोग हे कार्यक्रमातील मुख्य आकर्षण होते. तसेच, उपक्रमामध्ये सातत्याने सहभाग घेणाऱ्या सोसायट्यांना प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सोसायट्यांना विशेष पुरस्कार देऊन पर्यावरणीय शाश्वततेसाठी असलेल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना गौरवण्यात आले.
आयपीसीएच्या उपसंचालिका डॉ. राधा गोयल यांनी सांगितले कि “पुण्यात एस.ओ.आर.टी. प्रकल्पाच्या यशामुळे नाविन्यपूर्ण आणि समुदाय-आधारित उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले. सेंद्रिय कचऱ्याचे मौल्यवान खतामध्ये रूपांतर केल्याने डंपिंग ग्राउंडवर अवलंबून राहणे कमी होते आणि पर्यावरण आरोग्यास मदत होते. या संपूर्ण उपक्रमात सातत्याने सहकार्य केल्याबद्दल आम्ही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि गृहनिर्माण सोसायट्यांचे आभार मानतो.”
या यशस्वी दुसऱ्या टप्प्यानंतर, एस.ओ.आर.टी. प्रकल्प आता पुण्यातील अधिकाधिक गृहनिर्माण सोसायट्या आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचण्याची योजना आखत आहे, जेणेकरून कचरा प्रक्रिया क्षमता वाढवता येईल आणि शहराद्वारे होणारे पर्यावरणीय परिणाम कमी करता येईल.
भारतीय प्रदूषण नियंत्रण संघ (आयपीसीए): भारतीय प्रदूषण नियंत्रण संघ(आयपीसीए) ही 2001 पासून कार्यरत असलेली एक स्वयंसेवी संस्था आहे जी कचरा व्यवस्थापन, हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण, पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती तसेच कचरा वेचणाऱ्या समुदायाच्या सक्षमीकरणावर कार्य करते. स्वर्ण लता मदरसन ट्रस्टच्या सहकार्याने, भारतीय प्रदूषण नियंत्रण संघाने (आयपीसीए) संपूर्ण भारतात तसेच पुण्यात अनेक यशस्वी प्रकल्प राबवले असून, समाजाला शाश्वत कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया उपाय स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.