बारामती, दि.१०: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत सर्व पात्र मतदारांनी मतदान करुन मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याकरीता प्रशासनाच्यावतीने मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, आज तालुका सायकल संघाच्यावतीने बारामती शहरात सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत “मतदार राजा जागा हो…लोकशाहीचा धागा हो” ‘मी नारी सगळ्यात भारी.. मी मतदान करणारच…’ आदी आशयांचे फलक घेवून शहरातील तीन हत्ती चौकातून रॅलीचा सुरुवात करण्यात आली आणि समारोप पेन्सिल चौक येथे करण्यात आला. यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघातील पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याकरीता प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे, येत्या 20 नोव्हेंबर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले.
यावेळी सहा निवडणूक निर्णय अधिकारी श्री गणेश शिंदे, बारामती सायकल क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास वायकर, सायकल क्लबचे सर्व सदस्य आणि प्रचार प्रसिद्धी प्रमुख सविता खारतोडे उपस्थित होते.