Spread the love

 

पुणे – मान्सूनचे आगमन होताच, बोपोडी येथील आठवडे बाजारात एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि वृक्षारोपणास प्रोत्साहन देण्यासाठी मोफत रोपे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या वतीने करण्यात आले. बाजारात खरेदीसाठी आलेल्या प्रत्येक ग्राहकास फुलझाडे, फळझाडे व औषधी वनस्पतींची रोपे मोफत देण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, ज्येष्ठ नेते इंद्रजित भालेराव, तसेच प्रशांत टेके आदी मान्यवर उपस्थित होते.

“वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, यासाठीच हा उपक्रम हाती घेतला आहे,” असे मत श्रीकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

सामाजिक भान जपत, पर्यावरण रक्षणासाठी राजकीय पुढाऱ्यांनी घेतलेला हा उपक्रम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.