Spread the love

 

समीर वानखेडे यांचे विशेष व्याख्यान संपन्न; एनडीपीएस कायदा आणि व्यसनमुक्त समाजावर भर

पुणे – “येणारा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) आहे आणि वकिलांनी त्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्ह्यांचे वाढते आव्हान लक्षात घेता, वकिलांनी एआयची समज विकसित करून न्याय व्यवस्थेला अधिक प्रभावी बनवण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन अग्रवाल समाज फेडरेशनचे संयुक्त सचिव आणि अखिल भारतीय उद्योग व्यापार सुरक्षा मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष नितीन अग्रवाल यांनी केले.

शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा न्यायालयातील अशोका सभागृहात ‘नशीले पदार्थांची गुंतागुंत : युवक, व्यसन आणि भारतातील कायदेशीर परिणाम’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन डीएसएच ट्रस्ट आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

नितीन अग्रवाल पुढे म्हणाले,
“समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळणे ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. त्यांच्या अनुभवातून आणि ज्ञानातून नवोदित विधिज्ञांना प्रेरणा मिळते. युवकांनी केवळ कायद्याच्या पुस्तकांपुरते न राहता, तंत्रज्ञान, सायबर गुन्हे आणि डिजिटल न्याय या आधुनिक विषयांकडेही लक्ष द्यायला हवे.”

एनडीपीएस कायद्याच्या बारकाव्यांवर समीर वानखेडे यांचे मार्मिक भाष्य

मुख्य वक्ते म्हणून डायरेक्टरेट जनरल ऑफ टॅक्सपेअर सर्व्हिसेस, चेन्नई येथील वरिष्ठ अधिकारी समीर डी. वानखेडे यांनी एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्स्टन्सेस) कायद्याच्या महत्त्वाच्या कलमांवर, त्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेवर आणि व्यावहारिक पैलूंवर सखोल विवेचन केले.

ते म्हणाले,
“जसे आपण ‘नो स्मोकिंग झोन’ ही संकल्पना स्वीकारतो, तसेच ‘नो नार्कोटिक्स झोन’ देखील समाजात निर्माण करणे आवश्यक आहे. व्यसनाविरुद्धची लढाई केवळ कायद्याची नसून ती सामाजिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक नागरिक सजग झाला, तरच ही समस्या मुळापासून नष्ट होईल.”

एक तास चाललेल्या आपल्या व्याख्यानात वानखेडे यांनी अनेक प्रत्यक्ष केस स्टडी, कायदेशीर उदाहरणे व अनुभव सांगून उपस्थित श्रोत्यांना व्यसनमुक्ती आणि कायद्याच्या व्यावहारिक अडचणींबाबत जागरूक केले. व्याख्यानानंतर त्यांनी विधी शाखेतील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना थेट आणि परखड उत्तरे दिली.

गणमान्य आणि प्रबुद्ध श्रोत्यांची उपस्थिती

या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणेच्या सचिव स्मिता सोनल पाटील, डीएसएच ट्रस्टचे सचिव ॲड. प्रकाश सालसिंगीकर, संरक्षक ॲड. सतीश गोरडे, अग्रवाल समाज फेडरेशन पुणेचे उपाध्यक्ष विनोद शिवनारायण बन्सल, युवा विंग अध्यक्ष विकास गर्ग, युवा उपाध्यक्ष करन अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर, वकील, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचा उद्देश केवळ माहितीपुरता मर्यादित न राहता युवकांना व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा देणे आणि तंत्रज्ञानाधारित आधुनिक न्यायव्यवस्थेची दिशा दाखवणे हा होता.ट