
पुणे | खडकी परिसरात एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या आरोपीला खडकी पोलिसांनी अतिशय शिताफीने अटक केली आहे. ही घटना 28 मे रोजी एल्फिन्स्टन रोडवर घडली होती, जेव्हा 65 वर्षीय शांता प्रविण साकरीया या रस्त्याने जात असताना अज्ञात इसमाने त्यांच्याजवळून सोन्याची साखळी हिसकावली होती.
दिवसा उजेडी, वर्दळीच्या ठिकाणी घडलेली ही धक्कादायक घटना परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख दिग्विजय चौगले यांच्याकडे तपास सोपवण्यात आला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलीस अमलदार अनिकेत भोसले, सुधाकर तागड, गालीब मुल्ला यांनी आरोपीबाबत महत्त्वाची माहिती मिळवली.
त्यानंतर 31 मे रोजी पोलीस तपास पथकाने आरोपीवर बारकाईने नजर ठेवून योग्य वेळी छापा टाकून त्याला अटक केली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. तसेच चोरी केलेली चेन कोठे विकली याचा तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोजकुमार पाटील, परिमंडळ 4 चे पोलीस उप आयुक्त श्री. हिंमत जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभागाचे मा. विठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कामगिरी खडकी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप फुलपगारे, तपास पथक प्रमुख दिग्विजय चौगले, पो.उपनिरीक्षक आश्विनी कांबळे, भाऊसाहेब शेवरे तसेच पोलीस अमलदार सुधाकर राठोड, अनिकेत भोसले, ऋषिकेश दिघे, दिनेश भोये, प्रताप केदारी, गालीब मुल्ला, प्रविण गव्हाणे आणि शिवराज खेड यांच्या संयुक्त प्रयत्नातून साध्य केले.