
*मुठा खोऱ्यातील मुलींच्या शिक्षणासाठी बसचे लोकार्पण*
मुळशी हा अतिशय समृद्ध तालुका आहे. तालुक्याचे रंगवले जाणारे चित्र अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी महिलांना आर्थिक सक्षम बनवणे गरजेचे आहे. त्यामुळे खोऱ्यातील महिलांनी एकत्रित येऊन एखादा उद्योग सुरु केल्यास त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून मुठा खोऱ्यातील दुर्गम भागातील मुली आणि शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात आली. त्याचे लोकार्पण ना. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी म्हसोबा ट्रस्टच्या अध्यक्षा मधुराताई भेलके, सचिव उमाताई माने, भाजपा पुणे शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे, खरवडे गावचे सरपंच शंकरराव मारणे, दिनेश जोगावडे, माऊली ढेबे, राहुल मारणे, हभप रामचंद्र भरेकर, एन. डी. मारणे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मुळशी तालुका अतिशय समृद्ध तालुका आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी लखपती दिदी उपक्रमाअंतर्गत; देशातील ग्रामीण भागातील महिलांना उद्योग होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.मुळशी तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. त्यामुळे मुठा खोऱ्यातील महिलांनी एकत्रित येऊन एखादा उद्योग सुरु करण्याची तयारी दर्शवल्यास; त्यांना उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले की, एमपीएससी-युपीएससीतील आपला टक्का वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी सारथी, पार्टी, महाज्योती सारख्या संस्थांच्या माध्यमातून यूपीएससीची तयारी करणाऱ्यांना फेलोशीप दिली जाते. त्यामुळे तालुक्यातील मुलं-मुलींनी एमपीएससी-युपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षांकडे वळले पाहिजे. त्यासाठी आवश्यक मदत करु, असेही त्यांनी यावेळी आश्वस्त केले.
दरम्यान, यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील दुर्गम भागातील गरजू मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली.