Spread the love

पुणे,: ‘मतदान करण्यास जाऊया, आपल्या देशाचा विकास करूया’ अशी घोषवाक्य लिहून त्याला अनुरूप रांगोळी रेखाटत तसेच ढोल ताशांच्या गजरात हातात मतदान जनजागृती घोषवाक्यांचे फलक घेऊन आणि ‘जना मनाची पुकार आहे, मतदान आमचा अधिकारी आहे’ अशा विविध घोषणा देत रॅलीच्या माध्यमातून बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगवीतील मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप टीमच्या वतीने सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या सीमा भोसले, स्वीप टीम समन्वय अधिकारी राजीव घुले, प्रिन्स सिंह, गणेश लिंगडे, दिपक एन्नावार, मनोज माचरे, विजय वाघमारे, लोखंडे तसेच बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या सबलीकरणासाठी मतदान करावे असे आवाहन करणाऱ्या रांगोळ्या रेखाटल्या. शिक्षकांनी तसेच पालकांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करुन प्रोत्साहित केले. विद्यार्थी, शिक्षक आणि स्वीप टीमच्या सहभागातून भव्य रॅलीचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ढोल रॅलीत ताशाच्या गजरात आपले मत, आपली ताकद.., आपले मत, आपला हक्क.., उत्सव निवडणूकीचा, अभिमान देशाचा.., चला मंडळी मतदानाला जाऊया अशी घोषवाक्य असलेले फलक हातात घेऊन मतदारांना मतदानाचे महत्व पटवून दिले.