आचारसंहिता कालावधीत जिल्ह्यात ७ कोटी रुपयाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त
पुणे, : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने राज्यात सर्वाधिक ७ कोटी ६३ लाख ३४ हजार रुपयाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. संपूर्ण राज्यातील सुमारे २५ टक्के जप्तीची कारवाई पुणे जिल्ह्यात झाली असून उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. दिवसे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे जिल्ह्याचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांचे अभिनंदन केले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईच्या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ पासून विविध पथके तयार करण्यात आली. या पथकांनी केलेल्या कारवाईत १ हजार १०० गुन्हे नोंदविण्यात आले असून १ हजार ४२ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २३४ वाहनासह ७ कोटी ६३ लाख ३४ हजार २३१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे अंमलबजावणी व दक्षता सह आयुक्त प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या पथकांकडून जिल्ह्यातील सर्व हातभट्टी निर्मिती, वाहतूक, विक्री, तसेच धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांत १ हजार ४२ वारस व ५८ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे. एकूण बिअर ३ हजार ९५१ ब.लि., कॅप्स-३२, देशी दारू- ४ हजार ४९८ ब.लि. विदेशी दारू (राज्यातील)- ४ हजार ५२ ब.लि., विदेशी मद्य (परराज्यातील गोवा)- २३३ ब.लि, लेबल संख्या- १० हजार ९३० ब.लि., अवैद्य गावठी हातभट्टी दारू १ लाख १५ हजार ५६४, गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे रसायन २ लाख ७९ हजार ३८० ब.लि, वाईन ४८५ ब.लि, ताडी ६ हजार २७५ लिटर व इतर ६२२ ब.लि तसेच २३४ वाहने असा एकूण ७ कोटी ६३ लाख ३४ हजार २३१ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उद्या 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत असून या दिवशी सर्व विधानसभा मतदार संघांचे अधिकृत निकाल जाहीर होईपर्यंत कोरडा दिवस (ड्राय डे) घोषित करण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद राहतील. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक किंवा मद्य वाटप आदी संबंधी माहिती, तक्रार द्यावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग अधीक्षक कार्यालयाच्या ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाचे अधीक्षक श्री. राजपूत यांनी केले आहे.