Spread the love

भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “३१ वे मोफत प्लॉस्टिक सर्जरी शिबीर” दिनांक २ जानेवारी २०२५ रोजी यशस्वी रित्या संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे सुरुवात झाली.

स्वर्गीय पद्मश्री डॉ. शरदकुमार दिक्षित (अमेरिका) यांच्या समरणार्थ हे शिबीर मागील ३० वर्षांपासून संचेती हॉस्पिटलमध्ये घेतले जाते, असे संचेती हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. पराग संचेती यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. डॉ. लॅरी वेनस्टाईन हे अमेरिकेमधून येतात आणि सेवा करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. पद्मभूषण डॉ. के.एच. संचेती आणि श्री. शांतिलाल मुथ्था हे या कॅम्पचे आधारस्तंभ आहेत, आणि त्यांच्या प्रेरणामुळेच हे काम मागील ३० वर्षांपासून निरंतर चालू आहे. उद्घाटन प्रसंगी अभय मुनोत, चेअरमन चांदमल मुनोत ट्रस्ट उपस्थित होते.

या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील विद्रूप वर्ण व डाग, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यातील विकृती अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत. “आपण सर्व या कॅम्पचा फायदा घेऊ शकता,” असे डॉ. पराग संचेती यांनी सांगितले.

या कॅम्पसाठी चांदमल मुनोत ट्रस्ट यांनी आर्थिक मदत केली याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. डॉ. पराग संचेती यांनी पुढे सांगितले, “असे कॅम्प अजून मोठ्या संख्येने करावेत, तसेच वर्षांमध्ये ६ महिने हे कॅम्प राबवावेत. प्लास्टिक सर्जरी आणि ऑर्थोपेडिक कॅम्प एकत्र करावेत, त्यातून मोठी सेवा होऊ शकते.” ते स्वतः जास्तीत जास्त वेळ सामाजिक कार्याला देणार असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

“या वर्षीपासून संचेती हॉस्पिटलमध्ये चॅरिटेबल ऑर्थोपेडिक OPD आठवड्यातून एकदा, दर बुधवारी सुरु केली आहे,” असे डॉ. संचेती यांनी सांगितले.

डॉ. लॅरी वेनस्टाईन जानेवारी महिन्यात पुणे, रायपूर, नाशिक, संगमनेर, जळगाव, बेळगावी आणि दिल्ली येथे भारतीय जैन संघटने मार्फत शिबिरे घेत आहेत, असे शिबीर प्रमुख शशिकांत मुनोत यांनी सांगितले.