सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोफ्लडी कमी करून प्रवास गतिमान व्हावा या उद्देशाने एकात्मिक वाहतूक आराखड्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी करीत असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
राजाराम पूल, नवशा मारुती, सरीता नगरी, दत्तवाडी, पानमळा या परिसरात मिसाळ यांच्या प्रचारार्थ आज पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आनंद रिठे, अनिता कदम, राजू कदम, श्रीकांत पुजारी, प्रशांत दिवेकर, विनया बहुलीकर, दैविक विचारे, सुजीत सामदेकर, शिवाजी भागवत, अरुण वीर, परेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिसाळ म्हणाल्या, मेट्रो, उड्डाणपूल, रस्ते यांचा या आराखड्यात एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राजाराम पूल चौकात 520 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला. राजाराम पूल ते फनटाइम थिएटर, विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर आणि इंडियन ह्यूम पाईप गेट ते इनामदार चौक या उड्डाणपुलांचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे, उर्वरित काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल.
मिसाळ म्हणाल्या, उड्डाणपुलाच्या कामादरम्यान वाहतुकीची कोफ्लडी होऊ नये यासाठी कालव्याच्या कडेने धायरीपासून विश्रांतीनगर मार्गे जनता वसाहत, नीलायम टॉकीजपर्यंत, गंगा भाग्योदयपासून इंडियन ह्यूम पाईपच्या जागेतून सनसिटीकडे असे पर्यायी रस्ते करण्यात आले. याच परिसरातील रस्ता अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्सनुसार विकसित करण्यात आला. उड्डाणपुलामुळे वेळेची, इंधनाची बचत आणि वाहतुकीची कोफ्लडी कमी होत आहे.
मिसाळ पुढे म्हणाल्या,खडकवासला-स्वारगेट-खराडी या 25.56 किलोमीटर मार्गाच्या मेट्रो दुसऱ्या टप्प्याला राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. या मेट्रोसाठी आवश्यक असणाऱ्या पिलरचे काम उड्डाणपुलाच्या उभारणीतच करण्यात आले आहे. या मार्गावर एकूण 22 स्टेशन असून, 8 हजार 131 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, पु. ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल या ठिकाणी मेट्रोची स्टेशन्स होणार आहेत. त्यामुळे पर्वती विधानसभेतील सिंहगड रस्त्यावरील प्रत्येक प्रभागात मेट्रो पोहोचणार आहे.