Spread the love

 

– रोहन सुरवसे पाटील यांची टीका; विरोधकांची झोप उडाल्याने सुडाचे राजकरण

पुणे: “राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वणी (नाशिक) येथे बॅग तपासण्याचा प्रकार संतापजनक आहे. मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीची अशाप्रकारे तपासणी करणे ही सत्ताधारी भाजपाची हुकूमशाही वागणूक आहे. ठाकरे यांच्या झंझावाती प्रचाराने विरोधकांची झोप उडाली आहे,” अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली.

रोहन सुरवसे पाटील म्हणाले, “राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. त्यामुळे विरोधकांची झोप उडाली असून, सूडभावनेने राजकारण सत्ताधारी करीत आहेत. नाशिकच्या वणीमध्ये काल ठाकरे यांची सभा होती. सभेसाठी ठाकरे हेलिकॉप्टरने गेले होते. हेलिपॅडवर उतरताच ठाकरे यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याचे समोर आले आहे. दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनी याचा व्हिडीओ शूट करत जनतसमोर सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे.”

उद्धव ठाकरे यांची बॅग तपासणे योग्य होते का? आजपर्यंत कुठल्या मंत्र्याच्या हेलीपॅडवर बॅगा तपासल्या आहेत का? राज्यात महायुतीची सत्ता असल्याने राज्यात असे प्रकार घडताहेत का? असे प्रश्न रोहन सुरवसे पाटील यांनी उपस्थित केले. उद्धवसाहेबांच्या सामानाची तपासणी केली, तशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह इतर मंत्र्यांची तपासणी होईल का? असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला पडला आहे, असेही सुरवसे पाटील म्हणाले.

रोहन सुरवसे पाटील पुढे बोलताना म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात सगळ्यांना समान न्याय आहे. मात्र, यंत्रणांना हाताशी धरुन लोकशाहीला पायदळी तुडवून हुकुमत गाजवण्याचे आणि संविधानाचा सातत्याने अवमान करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. मात्र, या सगळ्यावर मात करून महाविकास आघाडी या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवेल, असा विश्वास वाटतो.”