महायुती सरकार दिव्यांगांच्या पाठिशी खंबीर उभी असून; शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, याचा पुनरुच्चार चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. तसेच, दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव समर्पित आहे, अशी भावना व्यक्त केली.
समुत्कर्ष सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कोथरूड मधील आशिष गार्डन येथे दिव्यांगाचा मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमात ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी समुत्कर्ष सोशल फाउंडेशनचे धनंजय रसाळ, अमोल शिंगारे, सचिन जाधव, भाजपा नेते बाळासाहेब टेमकर, सुशील मेंगडे, सुप्रिया माझिरे, विद्या टेमकर, स्वप्नील राजिवडे, कैलास माझिरे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींसोबत मी खूपच जोडला गेलो आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. महायुती सरकार दिव्यांग बांधवांच्या पाठिशी सदैव खंबीरपणे उभे आहे. शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिव्यांगांचा मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्यातही दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिन; अशी ग्वाही यावेळी दिली.