Spread the love

पुणे, दि. १६ : पर्वती मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक आणि उद्योगपती चंद्रभान पुनमचंद भन्साळी यांनी वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदानाद्वारे हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. श्री. भन्साळी यांच्यामध्ये असलेला उत्साह आणि लोकशाहीबद्दलची दृढ निष्ठा यावेळी पहावयास मिळाली. प्रत्येकाने मतदान करून आपली लोकशाही बळकट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वती मतदारसंघात गृह मतदान प्रक्रिया सूरू करण्यात आली आहे. फॉर्म १२ डी भरून गृह मतदानासाठी नोंदणी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. भन्साळी यांचे गृह मतदान करून घेण्यासाठी हे पथक त्यांच्या घरी पोहोचले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटेश दुर्वास, नायब तहसीलदार सरिता पाटील पथकासोबत भन्साळी यांच्या उपस्थितीत गृहमतदानाची प्रक्रिया पार पडली.