मावळ विधानसभातील पहिला आमदार ठरला, एक लाखांच्या मताधिक्क्याकडे वाटचाल करणारा , विरोधकांचा सुफडा साफ
पुणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे कल आता समोर येत आहेत. महाराष्ट्रात 2014 पेक्षा भाजपची मोठी लाट आल्याचं दिसत आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून आता जवळपास अर्ध्या जागांचे निकाल आता समोर आले आहेत. यामध्ये काही जागांवरील चित्र स्पष्ट झाले आहे. पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचा विजय झाला आहे.
मावळ विधानसभा मतदार संघात महायुतीतील नाराजांनी उदयास आणलेला मावळ ‘पॅटर्न’ फेल झाला आहे.पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके विजयी झाले आहेत. त्यांना एक लाखाचे मताधिक्य मिळाले आहे.
मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि महायुतीतील नाराजांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारात झालेल्या लढतीमुळे मावळकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. या मतदार संघात ३२,३५८ म्हणजेच १.४३ टक्के मतदान वाढले आहे. या वाढीव मतदानाने मावळ ‘पॅटर्न’ला धक्का दिला आहे. आमदार सुनील शेळके पूर्वी भाजपमध्येच होते. २०१९ मध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली. उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांना पराभूत केले. तेव्हापासून आमदार शेळके आणि मावळ भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला. भाजपने मावळवर दावा केल्यानंतरही जागा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली. पवार यांनी शेळके यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आणि महायुतीत फूट पडली. भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात असलेल्या बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने मावळ ‘पॅटर्न’ निर्माण झाला.
मावळ मतदारसंघात सुनील शेळके यांच्याविरूद्ध अण्णा भेगडे मैदानात होते. महाविकास आघाडीने भेगडे यांना पाठिंबा दिला होता. बंडखोरी केलेल्या अण्णा भेगडे शरद पवार गटानेही पाठिंबा दिला होता. मात्र जनतेने सुनील शेळके यांच्या बाजूने कौल दिलाय.
यंदाच्या निवडणूकीमध्ये जनतेने महायतीला पाठिंबा दिल्याचं दिसून आलं आहे. महायुतीला 200 पेक्षा अधिक जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीला अपयश आल्याचं दिसून आलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला लाडक्या बहीण योजनेचा फायदा झाला आहे. महिलांची एकगठ्ठा मते महायुतीच्या उमेदवारांना मिळालीत. सुनील शेळके आणि भेगडे यांच्यात चुरशीची निवडणूक होईल असं सर्वांना वाटत होतं. मात्र शेळकेंनी एकतर्फी विजय मिळवत वन साईड बाजी मारली.