Spread the love

 

आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मुख्य निवडणूक कचेरीचे उद्घाटन

आपल्या पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून आला तर आपल्या कार्यकर्त्यांचीही ताकद वाढते, प्रशासनात आपला शब्द प्रभावीपणे ऐकला जातो, त्यामुळे प्रचार काळात अत्यंत आक्रमकपणे काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करा आणि त्यांना विजयी करा असे प्रतिपादन शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे.

कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट आणि मित्रपक्षांचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अप्पा बळवंत चौकातील सोमवंशीय क्षत्रिय समाज ट्रस्ट कार्यालयातील मुख्य निवडणूक कचेरीचे उद्घाटन आज अरविंद शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले की ही निवडणूक कोणाच्या व्यक्तिगत मानसन्मानाची निवडणूक नाही. केवळ उमेदवाराबरोबर दिसणं महत्त्वाचं नाही, तर मतदार संघातील आपलं काम दिसणं अत्यंत महत्त्वाचं आहे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आपला आमदार निवडून आला तर आपलीच ताकद वाढणार आहे त्यामुळे प्रचारासाठी जे 14 दिवस राहिले आहेत ते पक्षाला द्या आणि त्यानंतर आपल्या कामांसाठी आमच्याशी आग्रहाने मागणी करायला या अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली. धंगेकर यांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी आक्रमकपणे कामाला लागा असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय मोरे यावेळी बोलताना म्हणाले की, राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिला सक्षमीकरण आणि पुणे शहरातील वाढत्या समस्या यावर भाजपकडे उत्तरे नाहीत. या विषयावर बोलताना भाजपाच्या लोकांची बोलती बंद होते. केवळ पंधराशे रुपये देऊन या राज्यातील कोणतीही महिला सुरक्षित राहू शकत नाही ही बाब सर्वांनीच लक्षात घेणे गरजेचे आहे. आगामी निवडणूक प्रचार काळात धंगेकर यांनी केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवा. धंगेकर यांच्या कार्यालयात काम घेऊन आलेला कोणताही मनुष्य काम पूर्ण झाल्याशिवाय परत गेलेला नाही ही बाबही मतदारांच्या मनावर ठसवा असे आवाहन संजय मोरे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रवींद्र माळवदकर म्हणाले की अफजल खान आणि तडीपाराच्या वैचारिक वारसांनी महाराष्ट्राचा अवमान चालवला आहे. त्यांनी गेल्या दहा वर्षात देशाचे आणि महाराष्ट्राचे वाटोळे केले. काँग्रेस प्रणित केंद्र सरकारने त्यांच्या राजवटीत अनेक भरीव विकास कामे केली, अंगणवाड्यांपासून अग्निबाण निर्मितीपर्यंतची कामे काँग्रेसने केली. काँग्रेसने उभारलेले हेच प्रकल्प विकण्याचे काम आज मोदी शहा यांच्या राजवटीने चालवले आहे.

इंटक संघटनेचे नेते सुनील शिंदे म्हणाले की, रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकल्यानंतरच या राज्यातील आणि देशातील राजकीय वातावरण बदलले आहे. पण आता कार्यकर्त्यांनी गाफील राहून चालणार नाही. धंगेकर यांच्या विजयासाठी समन्वय समितीकडून ज्या सूचना येतील त्या सर्वांनी कसोशीने अंमलात आणाव्यात असे आवाहन शिंदे यांनी केले. आमच्या कामगार संघटनांच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीचे काम आमच्या परीने या आधीच सुरू केले आहे अशी माहिती ही त्यांनी दिली.

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शामला धायगुडे यांचेही यावेळी भाषण झाले. त्या म्हणाल्या की धंगेकर यांना आमदारकीचा अत्यंत कमी अवधी मिळाला, पण या अवधीतही त्यांनी केलेली भरीव कामे आपल्याला कसबा मतदारसंघात ठिकठिकाणी दिसत आहेत.

आम आदमी पक्षाचे किरण कद्रे यांनी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात संघटितपणे मतदारांमध्ये जागृती करण्याचे आवाहन यावेळी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कसबा ब्लॉक अध्यक्ष गणेश नलावडे यांनी केले. शिवराज भोकरे यांनी आभार मानले.

कचेरी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उमेदवार रवींद्र धंगेकर, शहर कॉंग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना (उ.बा.ठा) शहर प्रमुख संजय मोरे, काँग्रेसचे नेते संजय बालगुडे, मुक्तार शेख, विरेंद्र किराड, अभिजित बारवकर, बाळासाहेब मारणे, अनिल सोंडकर संदीप आटपाळकर, सुनील शिर्के, हेमंत राजभोज, नितीन जाधव, जयसिंग भोसले, अक्षय माने, संदीप गायकवाड, दीपक जगताप, स्वाती कथळकर, स्वाती शिंदे, निकीला मारटकर, पपिता सोनवणे, सोनी ओव्हल, दीपक गायकवाड इत्यादी उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.