
युवा नेतृत्व विकासासाठी मार्गदर्शन
गोरान ग्रॉसकोफ फॅमिली क्लिनिकचा १४ वा वर्धापन दिन आणि राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ‘युवा नेतृत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड येथील गोरान ग्रॉसकोफ फॅमिली क्लिनिकमध्ये आयोजित करण्यात आले. यामध्ये १२० हून अधिक युवक युवती सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, मेरा युवा भारतचे डिस्ट्रिक्ट युथ ऑफिसर आशिष शेटे आणि साई एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष सागर शेडगे उपस्थित होते.
मुख्य वक्ते किरण वैद्य यांनी युवकांना कौशल्य, सातत्य, चिकाटी, अभ्यास व ज्ञान यांच्या माध्यमातून उत्तम नेतृत्वगुण आत्मसात करण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःच्या अनुभवांद्वारे व्यक्तिमत्व विकास व नेतृत्वाची शिदोरी कशी वाढवता येते याबाबत माहिती दिली.
आशिष शेटे यांनी युवकांसाठी सरकारतर्फे उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती दिली व त्यामध्ये सहभागी होण्यासाठी लागणारी पात्रता स्पष्ट केली. तर सागर शेडगे यांनी साई एज्युकेशन ट्रस्टतर्फे गरीब विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षण व वसतिगृहाच्या सुविधा यांचा आढावा घेतला.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संस्थेच्या अध्यक्षा फ्रेनी तारापोर यांनी नेतृत्वगुणांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, ‘आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक स्तरावर नेतृत्व आवश्यक आहे आणि युवकांनी यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे.’
समारोपात डॉ. नेहा साठे यांनी सांगितले की, ‘युवकांना विविध विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि लैंगिक व प्रजनन आरोग्य हक्कांबाबत त्यांचा सहभाग वाढवणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.’
उपाध्यक्षा गीतांजली देशपांडे यांनी संस्थेच्या गेल्या १४ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी एक महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर केला – ९ ते १४ वयोगटातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कॅन्सर प्रतिबंधासाठी आवश्यक एचपीव्ही लसीपैकी एकावर दुसरी मोफत, तसेच १४ वर्षांवरील मुलींसाठी दोन लसींवर एक लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प संघटक अर्चना ससाणे यांनी केले, तर विभाग संघटक पौर्णिमा साळुंके यांनी आभार प्रदर्शन केले.