Spread the love

पिंपरी चिंचवड

शहरात गढूळ व अशुद्ध पाणीपुरवठ्याविरोधात रयत विद्यार्थी विचार मंच संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. धम्मराज साळवे यांचे आयुक्तांना निवेदन
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक प्रभागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा दर्जा अत्यंत खालावलेला असून, नागरिकांना गढूळ, दुर्गंधीयुक्त व आरोग्यास अपायकारक पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार रयत विद्यार्थी विचार मंचने केली आहे.

या अनुषंगाने रयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. धम्मराज साळवे यांनी आज दिनांक ०४ जून २०२५ रोजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केले. त्यांनी निदर्शित केले की गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा दर्जा अत्यंत खालावलेला असून, नागरिकांना गढूळ, दुर्गंधीयुक्त व आरोग्यास अपायकारक पाणीपुरवठा होत असून पाण्यात माती, कचरा व इतर अपद्रव्य आढळून येत आहे त्यामुळे नागरिकांना त्वचेचे विकार, जुलाब, उलट्या, पोटदुखी इत्यादी गंभीर आजार होत आहेत.

या परिस्थितीला सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम करणारी बाब मानत, पुढील तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:

१)जलपुरवठा विभागामार्फत पाण्याच्या गुणवत्तेची तात्काळ तपासणी करणे.

२)पाणी शुद्ध करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करणे.

३)भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये म्हणून कायमस्वरूपी देखभाल व उपाययोजना प्रभावीपणे राबविणे.

“नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका. स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. महानगरपालिकेने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष घालावे, अन्यथा आंदोलनात्मक पावले उचलावी लागतील,” असा इशारा देखील अ‍ॅड. साळवे यांनी दिला.

रयत विद्यार्थी विचार मंचकडून हा मुद्दा केवळ प्रशासनापर्यंत मर्यादित न ठेवता जनजागृतीच्या माध्यमातूनही पुढे नेण्यात येणार आहे.