*पुण्यात १२५० मृदंगांच्या एकत्रित वादनातून स्वरब्रम्हाची अनुभूती*
*हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवात महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेल्या मृदंग वादकांनी केले मृदंग वादन*
पुणे : जय जय विठोबा रखुमाई चा गजर, तब्बल १२५० मृदंगांचा एकत्रित निनाद आणि त्याला टाळांची सुरेख साथ… अशा भारलेल्या वातावरणात हिंदू सेवा महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या १२५० हून अधिक मृदंग वादकांनी भक्तिमय वादन कलेचा सुरेल आविष्कार सादर केला. मृदंगांचा स्वर टिपेला पोहोचताना पुणेकर देखील टाळ्यांच्या माध्यमातून या भक्तीरसात न्हाहून निघाले आणि प्रत्यक्षपणे हा स्वरब्रह्माची अनुभूती घेतली.
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये एकत्रितपणे १२५० मृदंगांचे वादन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, महेश सूर्यवंशी, ह.भ.प.चिदंबरम महाराज साखरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नमन आणि त्यानंतर पंचपदीने झाली. रूप पाहता लोचनी… सुंदरते ध्यान उभे विटेवरी… पुंडलिक वरदे हरी विठ्ठल … तुमच्या नामघोषासह मृदंग आणि टाळांचा गजर झाला. वादनाची सांगता सांगता आरतीने ने झाली. यावेळी जेष्ठ वादकांसह युवक-युवती आणि बाल वादक देखील सहभागी झाले होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात कुंभाची तयारी सुरूआहे मात्र इथे देखील एक कुंभच पाहायला मिळत आहे. उपासना आणि आराधनेचे बळ वाढवणे, हा यामागील उद्देश आहे. मंदिरांनी सामाजिक काम करावे आणि माणसात परमेश्वर ओळखावा, ही मूळ कल्पना आहे. हिंदू धर्म पाच हजार वर्षांपेक्षा जास्त काळ आक्रमणे होऊन देखील टिकला. धर्म टिकून ठेवण्याची प्रेरणा मंदिरांनी दिली. त्यामुळे त्यांचे महत्त्व खूप मोठे आहे.
अशोक गुंदेचा म्हणाले, चार दिवसीय महोत्सव विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामधील १२५० मृदुंग वादकांनी एकत्रित मृदंग वादनाचा केलेला कार्यक्रम हा सर्वोच्च बिंदू होता. महोत्सवात १२६ मठ मंदिरांनी सहभाग घेत १८० स्टॉल द्वारे आपल्या सेवा कार्याची माहिती दिली.
फोटो ओळ – हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या १२५० मृदंग वादकांनी एकत्रित मृदंग वादन केले.