Spread the love

पुणे, – चासकमान धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे आणि धरण 100% क्षमतेने भरल्यामुळे आज दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता धरणाच्या सांडव्याद्वारे 1100 क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे. यासोबतच, अतिवाहीनीद्वारे (Escape) आणखी 400 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार असून, एकूण 1500 क्युसेक पाणी भीमा नदीपात्रात सोडले जाईल.

जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, कोणीही नदीपात्रात जाऊ नये. तसेच, नदीत पाणी पंप करणारे यंत्र, शेतीसाठी असलेले अवजारे, जनावरे अथवा इतर साहित्य असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे.

सखल भागांतील नागरिकांना वेळीच सूचित करण्यात यावे, तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

**— जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन**