Spread the love

नमस्कार,
मतदार कोथरूडकर बंधू-भगिनी आणि नवमतदारांनो…

महाराष्ट्रातल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण मतदान करणार आहोत. त्यापूर्वी तुमच्याशी थोडंसं हितगुज करावंसं वाटतंय.
पाच वर्षांत बरंच काही घडलंय. तरी हिंदुत्वाच्या धाग्याने बांधलेली आपली वीण तशीच कायम आहे. हिंदुत्वच आपला श्वास आहे. राज्यात हिंदुत्वाच्या विचारांचे महायुती सरकारच पुन्हा सत्तेवर येण्यासाठी आपण २० तारखेलाही मतदान करायचंय.
अलीकडेच लोकसभेचीही निव़डणूक झाली; त्यातही भाजपाप्रणित एनडीए सरकारच पुन्हा सत्तेवर आलं. देशातल्या मतदारांनी स्थैर्याला, प्रगतीला, विकासाला आणि सर्वसमावेशतेलाच पुन्हा कौल दिला. राज्यातही मतदार याच विचारांतून मतदान करतील, याची मला खात्री आहे. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार सुज्ञ मतदार निवडून देतील, याबाबत माझ्या मनात तरी काहीच शंका नाही.
ही खात्री असण्यामागे बरीच कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आमचं काम आणि त्यात जनतेचाही असलेला सहभाग.
कोथरूडचंच उदाहरण घेऊया. पाच वर्षांपूर्वी मी कोथरूडमधून प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवली. आपला परिचय नव्हता, अशातला भाग नाही. पण तुम्ही अगदी मनापासून मतरूपी आशीर्वाद दिलात की, निवडून आल्याचं समजताच माझ्याही नकळत डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.
तेव्हाच मनोमन ठरवलं. कोथरूडकरांच्या या विश्वासाला अजिबात तडा जाता कामा नये, अशा पद्धतीनेच काम करायचं. कोथरूडची पताका अधिकाधिक उंच कशी जाईल, याचाच विचार करायचा. याच ध्यासातून मग मी पुढची पाच वर्षं काम करत राहिलो. माझ्या त्या प्रयत्नांचे दोन साक्षीदार आहेत. एक म्हणजे तो सर्वशक्तीमान परमेश्वर आणि दुसरे तुम्ही – जनता जनार्दन!
या दोन्ही परमेश्वरांना साक्षी ठेवूनच मी कामाला सुरुवात केली. जरा घडी बसू लागते ना लागते, तोच मार्च २०२० मध्ये कोव्हिडचं संकट आलं. आपलं सगळ्यांचं जगणंच उलटं-पालटं झालं. सगळीकडे लॉकडाउन झालं, तरी वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा सुरू असणं गरजेचं होतं. ही गरज ओळखून या दोन्ही सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी करता येईल, ती सर्व मदत केली. रुग्णसेवेतही खारीचा वाटा उचलला, कारण प्रश्न माझ्या कोथरूडकरांच्या सुरक्षिततेचा होता.
यथावकाश कोव्हिडचं ग्रहण संपलं. राज्यातही महायुतीचं सरकार आलं. मग मात्र मागे वळून बघायची गरजच उरली नाही. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील सरकारच्या साथीनं आपण कोथरूडमध्ये जणू विकासाची बुलेट ट्रेनच सुरू केली. अल्पावधीतच अनेक कामे मार्गी लागली, कारण तुम्ही – कोथरूडकर माझ्या साथीला होता.
मग तुमच्या-माझ्या जगण्यातले वीजपुरवठा, पाणीपुरवठा असे प्रश्न बघता बघता सुटले. त्यात राज्यातल्या महायुती सरकारचं पाठबळ महत्त्वाचं होतं. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या रुपाने दोन भरभक्कम पाठीराखे आपल्याला मिळाले. मतदारसंघातील महत्त्वाच्या समस्या, प्रश्न मग चुटकीसारखे मार्गी लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातला विकसित भारत कोथरूडमध्ये आणायचा याच ध्येयाने मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यातूनच मग अनेक मोठे प्रकल्प हा हा म्हणता पूर्ण झाले.
उदाहरणच द्यायचं तर, चांदणी चौकातला उड्डाणपूल आणि पुण्यातील पहिल्या मेट्रोचं देता येईल.
पक्षभेद न पाळता केवळ कोथरूडचा विकास याच हेतूनं काम केलं. त्यात सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले. धार्मिक उपक्रमांना तुम्ही दिलेली साथही कल्पनातीत होती.
आज मागे वळून पाहताना हे सगळं आठवून थक्क व्हायला होतं. मनात एकच विचार येतो, हे इतकं सगळं मी कसं करू शकलो असेन? पुढच्याच क्षणी चेहऱ्यावर हास्य पसरतं आणि उत्तर लक्षात येतं… मी तर निमित्तमात्र. हे सगळं शक्य झालं ते फक्त कोथरूडकरांच्या सहभागामुळेच!
बाकी, आमचं काम तुमच्यासमोर आहेच. त्याची किती उजळणी करायची… फक्त इतकंच सांगतो… राज्यात पुन्हा हिंदुत्ववादी, सर्वसमावेशक महायुतीचं सरकारच सत्तेवर येणं गरजेचं आहे.
म्हणून, एकच विनंती करतो… मतदान अवश्य करा. कुठल्याही परिस्थितीत मतदान करा आणि महायुतीलाच कौल द्या,
कोथरूडची, महाराष्ट्राची प्रगती साधेल फक्त महायुती!

मतदान : बुधवार, २० नोव्हेंबर २०२४
वेळ: सकाळी ७ ते सायं. ६

धन्यवाद.

आपलाच
चंद्रकांतदादा पाटील
आमदार, कोथरूड