पुणे : प्रतिनिधी
चंदननगर येथे शुक्रवारी दुपारी महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापू पठारे यांच्यावर जोरदार टीका केली. महाराष्ट्राच्या बजेटची आकडेवारी जाहीर करीत पवार यांनी महाविकास आघाडीच्या घोषणापत्राची पोलखोल केली.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, महायुतीची वाढती ताकद पाहून महाविकास आघाडीकडून फसव्या घोषणा केल्या जात आहेत. मी अर्थमंत्री आहे. आम्ही केलेल्या लाडकी बहीण योजना, मोफत तीन सिलेंडर, विद्यार्थ्यांना स्टायपेंड अशा विविध योजनांसाठी ७५ हजार कोटी खर्च येतो. या योजनांचे यश पाहून महाविकास आघाडीने खोट्या घोषणा केल्या आहेत. त्यांच्या फसव्या योजनांसाठी राज्य सरकारला तीन लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन व राज्याचे राहिलेल्या कर्जाचे व्याज यासाठी सुमारे साडेतीन लाख कोटी खर्च होतो. राज्याचे उत्पन्न सुमारे साडेसहा लाख कोटी आहे. मग पैसेच शिल्लक राहिले नाहीत तर विरोधक विकास कामे कुठून करणार आहेत, असा सवाल पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून केला. शरद पवार गटाचे उमेदवार बापू पठारे यांच्याकडून दडपशाही, दमदाटी चालू असल्याचे समजले असून आम्ही काही हातात बांगड्या भरल्या नाहीत. तुम्हाला स्थायी समिती, आमदारकी मीच दिली होती. तुमची सगळी अंडी पिल्ली माझ्याकडे आहेत, असा इशारा पवार यांनी पाठरेंना दिला.
महाविकास आघाडीचे सरकार येणार नाही याची त्यांना जाणीव झाल्यानेच खोट्या घोषणा केल्या जात आहेत. कार्यकर्त्यांनी आणि जनतेने त्यांच्या घोषणांना बळी पडू नये, असे आवाहन पवार यांनी उपस्थितांना केले. राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या सर्व योजना राज्याची आर्थिक शिस्त न मोडता चालू आहेत. पुण्यातील वाघोली, उरुळी कांचन अशा भागांना मेट्रोने जोडण्याचे नियोजन आहे. कोणतेही प्रकल्प राज्याबाहेर चाललेले नाहीत. वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठे बंदर महाराष्ट्रात होत आहे. आपल्याच विचाराचे सरकार केंद्रात असल्याने सर्व प्रकल्प, योजना मार्गी लागत आहेत. विरोधक फक्त मते मिळविण्यासाठी फसव्या घोषणा करीत आहेत. आम्ही सरकारमध्ये असताना योजना अंमलात आणल्या आहेत.
वडगावशेरीला दोन आमदार मिळणार आहेत :
वडगाव शेरीचा झपाट्याने विकास करायचा आहे. मेट्रो, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, मूलभूत सुविधा यांसाठी यापुढेही निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. वडगावशेरीकरांनो, तुम्हाला दोन आमदार मिळणार आहेत. माझ्यासमोरच देवेंद्र फडणवीसांनी मुळीक यांना फोन करून विधान परिषदेचे आश्वासन दिलेले आहे. विरोधक फूट पाडण्याचे, दुही माजविण्याचे प्रयत्न करतील. पण कार्यकर्त्यांनी सावध राहावे. मनात कोणत्याही प्रकारचा किंतू – परंतु न ठेवता पुण्यातील आठही उमेदवार निवडून आणायचे आहेत, असे आवाहन पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
तेवीस तारखेला सुनील टिंगरे पुन्हा आमदार होतील : माजी आमदार जगदीश मुळीक
महायुतीचे सर्व कार्यकर्ते टिंगरे यांना निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करीत आहेत. माझ्या आणि टिंगरे यांच्या दहा वर्षांच्या काळात वडगाव शेरीचा विकास झाला आहे. निवडणुकीनंतर महायुतीच्या सरकारमध्ये वडगावशेरीचा आमदार असणार आहे. तेवीस तारखेला सुनील टिंगरे पुन्हा आमदार होतील, असा विश्वास माजी आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.
विरोधक मतदारांची दिशाभूल करीत आहेत. फेक नरेटीव पसरवले जात आहेत. वडगाव शेरीत वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, रस्ते, उद्याने, आरोग्य सेवा यांसाठी भरीव निधी आणला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी झपाटून काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी कार्यकर्त्यांना केले. या वेळी दीपक मानकर यांनीही बापू पठारे यांच्यावर जोरदार टीका करीत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले. या वेळी मातंग समाजाकडून सुनील टिंगरे यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
मेळाव्याला माजी आमदार जगदीश मुळीक, अर्जुन गरुड, दीपक मानकर, प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक योगेश मुळीक, उषा कळमकर, अशोक कांबळे, तसेच, रुपाली ठोंबरे, सतीश म्हस्के, संगम शंकर, अर्जुन जगताप, सुनील जाधव, नारायण गलांडे, प्रकाश भालेराव, बाळासाहेब जानराव, अशोक खांदवे, संतोष खांदवे, चंद्रकांत जंजिरे… महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.