
महाराष्ट्र मंडळ श्रीलंकेचा पुढाकार ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाकरिता मूर्ती सुपूर्द
पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… चे स्वर आता बेल्जियम पाठोपाठ श्रीलंकेमध्ये देखील निनादणार आहेत. नुकतीच महाराष्ट्र मंडळ बेल्जियमच्या सदस्यांनी बेल्जियम मध्ये गणेशोत्सवासाठी श्रीं ची मूर्ती नेली. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र मंडळ श्रीलंका यांच्या प्रतिनिधींनी पुण्यात येऊन दगडूशेठ बाप्पांची मूर्ती नेली असून त्याची प्रतिष्ठापना गणेशोत्सवात श्रीलंकेमध्ये प्रथमच होणार आहे.
पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात विधीवत पूजन करुन नुकतीच महाराष्ट्र मंडळ श्रीलंकेच्या सदस्यांकडे ट्रस्टतर्फे सुपूर्द करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र मंडळ श्रीलंकेच्या प्रतिनिधी मीनल रेणावीकर, ट्रस्टचे सहचिटणीस अमोल केदारी, राजाभाऊ घोडके यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुण्यामध्ये ही मूर्ती सुभाषनगरमधील श्री नटराज आर्टचे भालचंद्र उर्फ लाला देशमुख व राजेंद्र देशमुख यांनी साकारली.
मीनल रेवणीकर म्हणाल्या, श्रीलंकेच्या गणेशोत्सवासाठी प्रसाद म्हणून बाप्पाची मूर्ती आम्हाला मिळाली आहे. हा आमच्यासाठी अमृतयोग आहे. श्रीलंकेमध्ये मराठी मंडळ व गणेशभक्त बाप्पाच्या आगमनाची वाट पाहात आहेत. तब्बल१७५ देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होत असून आता श्रीलंकेमध्ये देखील दगडूशेठ बाप्पांची मूर्ती विराजमान होणार असल्याचा आम्हाला आनंद आहे.