Spread the love

सर्कस मधील कलाकारांना शासनाने पेंशन व प्रधानमंत्री घरकुल योजनेतून घर द्यावे – संदीप खर्डेकर

सर्कस ही एक कला असून मनोरंजनासाठी चा एक जिवंत खेळ आहे म्हणून ही कला आणि यातील कलाकार जगले पाहिजेत असे उद्गार नगरविकास, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय व परिवहन राज्यमंत्री नामदार माधुरीताई मिसाळ यांनी काढले. सर्कस मधील कलाकारांच्या मागण्या शासनाकडे निश्चितच मांडू असेही त्या म्हणाल्या.
आज सिंहगड रस्त्यावरील रॅम्बो सर्कस मधील अगदी खरा वाटणारा “डिजिटल हत्ती” चे व सर्कस चे औपचारिक उदघाटन करण्यात आले त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.तीस वर्षांपूर्वी मी माझे पती कै.सतीशशेठ मिसाळ, संदीपजी खर्डेकर, रॅम्बो सर्कस व हॅन्डलूम हॅंडीक्राफ्ट फेयर चे संचालक पी. टी. दिलीप, ओमप्रकाश कोहली यांच्या सोबत सर्कस बघायला यायचे व येथे कलाकारांसोबत आम्ही जेवायचो अश्या ह्रद्य आठवणी ही त्यांनी सांगितल्या.
यावेळी भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, रॅम्बो सर्कस चे संचालक सुजीत दिलीप, श्री. जॉन, श्री. अरुल होरायझन,भाजयुमो क्रीडा आघाडी अध्यक्ष प्रतीक खर्डेकर,सामाजिक कार्यकर्त्या सौ. सोनाली गुप्ते,भाजपा च्या महिला आघाडी च्या उपाध्यक्ष सौ.कल्याणी खर्डेकर, प्रा. चेतन दिवाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
पूर्वी सर्कस मध्ये प्राण्यांचे विविध खेळ दाखविले जायचे आता मात्र प्राणीमित्रांच्या भूमिकेमूळे आणि कायद्यातील बदलामुळे सर्कशीतून प्राणी गायब झाले आणि आता देशातील विविध भागातील स्त्री पुरुष कलाकार जीवापाड मेहनत घेऊन आपली कला सादर करतात असे संदीप खर्डेकर म्हणाले. तसेच पूर्वी चित्रपटांच्या बरोबरीत सर्कस बघायला गर्दी होत असे, मात्र आता परिस्थिती बदलली आहे त्यामुळे आता शासनाने सर्कशीतील कलाकारांकडे लक्ष देणे गरजेचे असून ह्या कलाकारांना पंतप्रधान घरकुल योजनेतून अल्प दरात घर उपलब्ध करून देणे व त्यांना पेन्शन देणे गरजेचे असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.
सुजीत दिलीप यांनी सर्कशीतील जोकर व अन्य कलाकारांसोबत ना. माधुरीताईंचा सत्कार केला व येणाऱ्या काळात आमच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले.सर्कस चा व्यवसाय कठीण काळातून जात असून तंबू ठोकण्यासाठी जागा मिळविण्यापासून अडचणीना सुरुवात होते असे ही सुजीत दिलीप यांनी सांगितले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे खेळ असून पुणेकर सर्कस च्या प्रयोगांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.