Spread the love

पुणे, : वाहनधारकांनी वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविताना http://transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच शुल्क भरण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निर्देशानुसार वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे अत्यावश्यक आहे. या निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या वाहनांना एचएसआरपी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनधारकांनी वाहनांवर एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहनही श्री. भोसले यांनी केले आहे.