Spread the love

रस्ता दुरुस्तीसाठी निदर्शन आंदोलन

पुणे: ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च करण्यात येत असताना, प्रत्यक्षातली परिस्थिती मात्र काही आणि भयानक वास्तव काही वेगळंच सांगते. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या वाघोली परिसरातील प्रमुख निवासी संकुले — अथकज विजय विहार, प्राईमेरा होम्स आणि रोहन अभिलाषा — अजूनही मूलभूत रस्ता व ड्रेनेजसारख्या सुविधांपासून वंचित आहेत.

वाघोली-लोहगाव रोड ते अग्निशमन केंद्र, अथकज विजय विहार, मोरे कॉर्नर, रोहन अभिलाषा रस्त्याची अवस्था अक्षरशः नरकयातना भासत आहे. ठिकठिकाणी चिखल, घाण, मोठाले खड्डे आणि पाण्याचे साचलेले डबके यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. लहान मुलं, वृद्ध आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता एक जीवघेणा प्रवास ठरत आहे.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाको वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शन आंदोलन करण्यात आले.

सर्वात दुःखद बाब म्हणजे अथकज विजय विहारमध्ये सैन्यातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि जवान वास्तव्यास आहेत, ज्यांनी देशासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. आज त्यांना त्यांच्या स्वतःच्या शहरात अशा अवस्थेत राहावं लागत आहे हे अत्यंत लज्जास्पद आहे.

रहिवाश्यांच्या प्रमुख मागण्या व प्रश्न:

टीम वाको आणि अन्य रहिवासी संघटनांच्या वतीने खालील गोष्टींची मागणी करण्यात आली आहे:

वाघोली-लोहगाव रोडचा तातडीने डांबरीकरण आणि दुरुस्ती करण्यात यावी.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर योग्य जलनिकासी व ड्रेनेज व्यवस्था करण्यात यावी.

संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

मंजूर केलेल्या १० लाख रुपयांच्या निधीचा हिशेब सार्वजनिक करण्यात यावा.

१० लाखांच्या निधीचं काय झालं?

जर निधी मंजूर झाला होता, तर प्रत्यक्षात काम का झाले नाही? ही पुणे महापालिकेची निष्क्रियता आहे की पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा प्रकार? — अशा स्वरूपाचे गंभीर आरोप निदर्शनादरम्यान उपस्थित करण्यात आले.

टीम वाकोने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की जर एक महिन्याच्या आत काम सुरू झाले नाही, तर पुढील टप्प्यात तीव्र आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.

पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या दाव्यांमधील आणि वास्तवातील हा फरक, प्रशासनाच्या आणि शासनाच्या असंवेदनशीलतेचं स्पष्ट उदाहरण आहे.

प्रश्न असा आहे — पुणे खरोखर स्मार्ट सिटी बनत आहे का? की केवळ फाईल्समध्ये आणि जाहिरातींमध्येच तेज झळकत आहे?