
पुणे बालपुस्तक महोत्सवात आयोजित परिसंवादातील सूर
पुणे : स्क्रीनमुळे मिळणारा तात्पुरता आनंद मिळवण्यापेक्षा दीर्घकालीन आनंदाचे पर्याय निवडले पाहिजेत. मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवून ठेवता येऊ शकते. घरातल्या वस्तू वापरून विविध उपक्रम घेता येतात. मोबाइलवर जास्त वेळ घालवल्यास मेंदूची निर्णय क्षमता कमी होण्याचा धोका असतो, असा सूर पुणे पुस्तक महोत्सवातील परिसंवादात व्यक्त झाला.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे बालपुस्तक जत्रा या कार्यक्रमात स्क्रीन टाइमचा राक्षस या विषयावर परिसंवाद झाला. त्यात स्मिता पाटील वळसंगकर, अर्चना कुडतरकर, डॉ. श्रुती पानसे यांनी सहभाग घेतला. प्रसाद मिरासदार यांनी सूत्रसंचालन केले.
स्मिता पाटील वळसंगकर म्हणाल्या, स्क्रीन टाइम कमी करणे हे घरात सगळ्यांनीच केले पाहिजे. खेळ, अभ्यास, झोप ह व्यवस्थित झाल्यावरच स्क्रीन पाहिला पाहिजे. स्क्रीन टाइम वाढल्यामुळे पुढच्या काळात मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन वेगवेगळे पर्याय कुटुंबात सगळ्यांनी मिळून शोधले पाहिजे. जेवताना मोबाइल, टीव्ही न बघणे, झोपायच्या आधी एक तास स्क्रीन बंद करणे, गप्पा मारणे, एकत्र खेळणे, वाचन करणे असे काही पर्याय आपण मुलांना दिले, तर मुलांचा स्क्रीन टाइम आपण नक्कीच करू शकतो. स्क्रीनमुळे मिळणारा तात्पुरता आनंद मिळवण्यापेक्षा दीर्घकालीन आनंदाचे पर्याय निवडले पाहिजेत.
अर्चना कुडतरकर म्हणाल्या, कंटाळा आला हे वाक्य मुलांच्या तोंडून आल्यावर पालकांनी आनंदाने नाचले पाहिजे. या वाक्यात मुलाना स्क्रीनपासून दूर ठेवण्याची ताकद आहे. या वेळी मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवून ठेवता येऊ शकते. घरातल्या वस्तू वापरून विविध उपक्रम घेता येतात.
डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या, मुले सतत मोबाइलवर असतात, गेम खेळतात. आपण खेळत असलेले गेम्स अत्यंत हुशार माणसांनी तयार केलेले आहेत, मुलांना कोणते रंग आवडतात , मुलांना काय खेळायला आवडेल, कोणत्या प्रकारचा संगीत मुलांना आवडेल, हे त्यांनी ठरवलेलं असतं. आपण त्यात गुंतून पडतो, हे मुलांनी लक्षात घेतले पाहिजे. मोबाइलवर नऊ मिनिटेच गेम्स खेळून मोबाइल बाजूला ठेवला पाहिजे. मोबाइलवर जास्त वेळ घालवला, तर मेंदूतली निर्णय क्षमता कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे गेम खेळणाऱ्यांपेक्षा जास्त हुशार झाले पाहिजे.