
सुमारे २०% नोकरदार महिला या कामाच्या तणावामुळे धूम्रपान करतात आणि या महिलांमध्ये भविष्यात फुफ्फुसाचा कर्करोगाचा धोका वाढतो.
दर महिन्याला २५ ते ३५ वयोगटातील १० पैकी ३ नोकरदार महिला खोकल्याची तक्रार घेऊन उपचाराकरिता तज्ज्ञांची भेट घेत असल्याचे आढळून आले आहे.
पुणे: तणाव हा नोकरदार महिलांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे, ज्यामुळे अनेक महिला धूम्रपानासारख्या वाईट सवयींच्या आहारी जातात. सुमारे २०% नोकरदार महिला या कामाच्या तणावामुळे धूम्रपान करतात आणि या महिलांमध्ये भविष्यात फुफ्फुसाचा कर्करोगाचा धोका वाढतो. या महिलांना भविष्यात फुफ्फुसाचा कर्करोग आणि इतर दीर्घकालीन फुफ्फुसांच्या विकारांचा धोका असतो. हे टाळण्यासाठी धूम्रपानाचे व्यसन सोडणे गरजेचे आहे. जागतिक फुफ्फुस कर्करोग दिनानिमित्त तज्ञांकडून महिलांना त्यांच्या फुफ्फुसांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे आणि धूम्रपानाचे व्यसन टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दर महिन्याला २५ ते ३५ वयोगटातील १० पैकी ३ नोकरदार महिला खोकल्याची तक्रार घेऊन उपचाराकरिता तज्ज्ञांची भेट घेत असल्याचे आढळून आले आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी नियमितपणे उपचार आणि फॅालोअप घेणे गरजेचे आहे.
कामाचा ताण वाढत असताना धूम्रपानाचा अवलंब करणे या चिंताजनक ट्रेंडमुळे येत्या काळात फुफ्फुसाचा कर्करोग, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), दमा आणि ब्राँकायटिस होण्याची शक्यता वाढली आहे. धूम्रपान-संबंधित फुफ्फुसांच्या समस्यांमध्ये वाढ होत असताना, वेळीच ही सवय टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. वेळीच निदान व उपचार तसेच फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत पुरेशी जागरूकता करण्यावर भर देणे गरजेचे आहे.
हल्ली कामाच्या ठिकाणी असलेली डेडलाइन, कामाचे वाढते तास, अपेक्षांचे ओझे, घर आणि ॲाफीस या दोघांचे योग्य असंतुलन राखणे अशा अनेक समस्यांना महिलावर्गास तोंड द्यावे लागते. वाढत्या कामांच्या तासामुळे पुरेशी विश्रांती न मिळाल्याने ताण येऊ शकतो. शिवाय ताणतणावामुळे थकवा येणे, चिंता सतावणे, झोपेसंबंधी समस्या, डोकेदुखी, स्नायूंवर ताण येणे आणि मूड स्विंग्स सारखी लक्षणे दिसून येतात. काही महिला तणाव कमी करण्यासाठी किंवा कामाच्या ठिकाणी सतर्क राहण्यासाठी धूम्रपानाच्या व्यसनाची निवड करू शकतात. मात्र धुम्रपान हे फुफ्फुसांना नुकसान पोहोचवते. कालांतराने, ते फुफ्फुसांच्या नाजूक अस्तरांना हानी पोहोचवते, त्यांची क्षमता कमी करते आणि श्वास घेण्यास अडचणी येतात. सिगारेटमधील हानिकारक रसायने थेट फुफ्फुसांचा कर्करोग, ब्राँकायटिस, दमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) अशा समस्यांना आमंत्रण देत असल्याची प्रतिक्रिया अपोलो स्पेक्ट्रा, पुणे येथील इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. आदित्य देशमुख यांनी स्पष्ट केले.
डॉ. देशमुख पुढे सांगतात की, कामाच्या ठिकाणी महिलांना प्रचंड ताणतणावाचा सामना करावा लागत आहे, त्यांच्यासाठी धूम्रपान हा तात्पुरता उपाय वाटू शकतो, परंतु प्रत्यक्षात ते दीर्घकालीन आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. सुमारे २०% नोकरदार महिला ताणतणावामुळे धूम्रपान करण्यास प्रवृत्त होतात आणि भविष्यात त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. धूम्रपानामुळे अशा महिलांची फुफ्फुसं देखील कमकुवत होतात. दरमहा, २५-३५ वयोगटातील १० पैकी ३ नोकरदार महिला खोकल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात उपचाराकरिता येतात. धूम्रपानाचे व्यसन टाळणे हे फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांना सुरळीतपणे ऑक्सिजनचा पुरवठा होतो, ऊर्जेची पातळी वाढते आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारते. नियमित शारीरिक हालचाली, दिर्घ श्वास घेणे, हायड्रेशन आणि वार्षातून एकदा फुफ्फुसांच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे.
कामाच्या ठिकाणी येणाऱ्या सततच्या तणावामुळे सुमारे १०% नोकदार महिला या धूम्रपान करण्यास प्राधान्य देतात. कालांतराने, धूम्रपान फुफ्फुसांच्या कार्याला बाधा आणते आणि फुफ्फुसांचा कर्करोग आणि इतर श्वसन विकारांना आमंत्रण देते. दर महिन्याला २७ ते ३५ वयोगटातील १० पैकी २ महिला सतत खोकला, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणं घेऊन उपचाराकरिता दाखल होतात. फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान छातीच्या एक्स-रे आणि सीटी स्कॅनद्वारे केले जाऊ शकते, त्यानंतर कर्करोगाच्या पेशींची उपस्थिती निश्चित करण्यासाठी बायोप्सी केली जाते. निदान निश्चित झाल्यानंतर उपचार हे कर्करोगाच्या टप्प्यावर अवलंबून असतात आणि त्यात शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, टार्गेट्ड थेरपी किंवा या सर्वांचा समावेश असू शकतो. धूम्रपानाची सवय सोडणे, घरातील प्रदूषण कमी करणे, पुरक आहार घेणे आणि योगा किंवा मेडिटेशन सारख्या तणाव व्यवस्थापन तंत्रांमुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाची शक्यता कमी होऊ शकते, अशी प्रतिक्रिया डॉ. ज्योती मेहता( रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर, तळेगाव) यांनी व्यक्त केली.