Spread the love

पुणे, दि. 16 : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्यावतीने कर्णबधिर मतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती करून देणे, मतदारांशी संपर्क साधणे, त्यांना मतदानाला मदत करणे इत्यादी कामांसाठी नियुक्त केलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली.

या प्रशिक्षणासाठी शाहू कॉलेज व अनंतराव पवार इंजिनिअरिंग कॉलेजचे एनएसएसच्या विद्यार्थी -विद्यार्थिनी तसेच पर्यवेक्षक रूपाली बलसाने, अरुण गोलाईत, शाहू कॉलेजचे राणी शितोळे, भाऊसाहेब जाधव आदी उपस्थित होते.

कर्णबधिर मतदारांसाठी दुभाषक म्हणून कसे काम करावयाचे याचे प्रशिक्षण इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कर्णबधिर शाळेतील विशेष शिक्षिका मनीषा वैद्य यांनी दिले. कर्णबधिर व्यक्तिशी संपर्क साधणे, मतदान करण्यासाठी आवश्यक असलेली ओळखपत्रे कोणती आहेत त्यांची नावे सांकेतिक स्वरूपात सांगून त्याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी मतदानाची शपथ घेतली. भारतीय सांकेतीक भाषेमधील राष्ट्रगीताने प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता झाली.