पुणे: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत 100 टक्के मतदान घडवून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संगिता राजापुरकर तसेच स्वीप नोडल अधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप उपक्रमाअंतर्गत पथके तयार करण्यात आली आहेत. त्याअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. ही टक्केवारी वाढवून त्याठिकाणी 100 टक्के मतदान घडवून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींच्या कार्यालयात स्वीप पथकाद्वारे बैठक घेवून नियोजन करण्यात आले. बैठकीला संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, तलाठी, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायतींच्या भागात मतदान जनजागृतीद्वारे मतदारांना असलेला मतदानाचा हक्क व तो बजावण्याचे कर्तव्य याविषयी मार्गदर्शन करुन मतदानाचे महत्व या कार्यक्रमांच्या माध्यमातून पटवून देण्यात आले. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात ग्रामपंचायतीतील सर्व पात्र मतदारांनी सहभाग घेवून मतदानाची टक्केवारी 100 टक्केपर्यंत वाढवून गावाचा लौकीक वाढवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.