शेलगांव,सांगवी-खडकी,देळूब,देगांव कु-हाडा,कोंढा,भोगांव,मेंढला,गणपूर, सावरगाव यासह अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला
अर्धापूर :- उध्दव सरोदे –
अर्धापूर तालुक्यात यापूर्वीही महिना भरापासून व ता.२७ शनिवारी रात्री पासून दिवसभर सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले.या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी नाल्यांना महापूर आला आहे.३ जनावरे दगावली असून शेकडो घरात पाणी शिरल्याने घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य खराब झाले आहे. पुराच्या पाण्याने शेलगांव,सांगवी, खडकी,देळूब,देगांव कु-हाडा,कोंढा, भोगांव,मेंढला,गणपूर,सावरगाव, यासह अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे अशी माहिती अर्धापूरचे तहसीलदार रेणूकादास देवणीकर यांनी आमच्या दैनिकाशी बोलतांना दिली आहे.अर्धापूर तालुक्यातील सर्वच शेती अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीने जलमय झाली आहे.शेतातील काळी माती वाहून गेली आणि जमिनी खरडून गेल्या असून शेतकऱ्यांचे यामुळे पुर्णपणे अतोनात नुकसान झालेले आहे. सर्वच पिके पाण्याखाली गेली आणि नदी नाल्यांना जागोजागी महापूर आला आहे.पुराच्या पाण्यासह शेतकऱ्यांचे स्वप्न पण पुर्णपणे वाहून गेली आहेत.सोयाबीन,कापूस,उडीद, मूग,तुर,हळद,केळी,पपई,ऊस यासह अन्य पिकांचे पुर्णपणे अतोनात नुकसान झाले आहे.शेतात तर पिक दिसतच नाही तर सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.शेतीला समुद्राचे स्वरूप आले असून शेती कुठे आहे हेच दिसत नाही.फक्त जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे.मागील व आताच्या या महाभयंकर नुकसानी बाबत शासनाने ताबडतोब नाराज,दुःखी व उपाशी शेतकरी आणि जनतेला मदत करून आधार द्यावा अशी मागणी शेतकरी व जनतेतून होत आहे.

