Spread the love

पुणे, दि. 16 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले.

अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आयोजित केलेल्या या प्रशिक्षणावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय नागटिळक, प्रमिला वाळुंज, सुरेश पठाडे, निवडणूक नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांच्यासह सूक्ष्म निरीक्षक तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

श्री. शिंदे यांनी मतमोजणीचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी विविध सूचना केल्या. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी शासकीय तंत्रनिकेतन, अवसरी (खुर्द) येथे मतमोजणी होईल, अशी माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

मतमोजणीच्या दिवशी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित रहावे, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे तंतोतंत पालन करून मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश देवून श्री. शिंदे यांनी देवून मतमोजणीसाठी असलेले टेबल आणि फेऱ्या याबद्दल माहिती दिली. मतमोजणीचे दुसरे विस्तारित प्रशिक्षण 22 नोव्हेंबर रोजी होईल, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.