
या नववर्षी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “सेलिब्रिटी मास्टरशेफ – अब उन सबकी सीटी बजेगी!”मध्ये थरारक पाककला स्पर्धा रंगणार आहे. या शोमध्ये सेलिब्रिटीजचा एक मजेदार संच सहभागी होत आहे, जो आपले पाककौशल्य दाखवण्यासाठी सरसावला आहे.
या सीझनमध्ये सामील होत असलेल्या कलाकारांमध्ये उषा नाडकर्णी आणि निक्की तांबोळी यांचाही समावेश आहे. या दोन्ही प्रतिभावान अभिनेत्री आनंदी, काहीशा मस्तीखोर स्वभावाच्या आहेत, ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला एक तडका मिळेल. एकीकडे, निक्कीच्या बिनधास्त व्यक्तिमत्त्वाला साजेसे पदार्थ, किचनमधल्या तिच्या नाट्यमय हालचाली दिसतील, तर दुसरीकडे उषा नाडकर्णीच्या अनेक वर्षांच्या अनुभवात मुरलेले सुजाणपण आणि चमचमीतपणा यांचे मिश्रण दिसेल. इतर सेलिब्रिटीजसोबतच्या त्यांच्या साहचर्यातून निर्माण होणारा पिढ्या तसेच पाकशैलीतील संघर्ष नक्कीच खुमासदार असेल.
रियालिटी टीव्ही स्टार निक्की तांबोळी आता कुकिंग स्टार बनण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्यात धडाडी आहे आणि तिला स्पर्धेचा त्वेष आवडतो. पण यावेळी ती स्पर्धेत उतरली आहे ती आपल्या वडिलांकडून मान्यता मिळवण्यासाठी. निक्की उत्साहाने सांगते, “मी पहिल्यापासून तशी बंडखोरच आहे. पण मला वाटते, स्वतःशी प्रामाणिक राहणे हीच खरी सुखाची रेसिपी आहे. मी केलेली निवड अनेकदा माझ्या वडीलांना पसंत पडलेली नाही. पण सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये मी दाखल होणार हे समजल्यावर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. आणि या गोष्टीचा मला आनंद वाटतो. माणसांशी नाते जोडणे आणि जखमा भरून काढणे हे खाद्य पदार्थांना छान जमते. मला आशा आहे की, या अनुभवातून मी माझे पाककौशल्य दाखवू शकेन आणि माझ्या कुटुंबाची मान ताठ करू शकेन.”
दुसरीकडे, वयाच्या 78 व्या वर्षीही उषा नाडकर्णींचा उत्साह दांडगा आहे. त्या देखील तितक्याच उत्साहाने या पाककलेच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांच्यातील या उत्साहामुळेच त्या उद्योगात सगळ्यांच्या लाडक्या आहेत. बोलताना उषा नाडकर्णींचा उत्साह ओसंडून वाहत असतो की, “माझ्या वयात मला असे वाटत होते, माझे सगळे काही करून झाले आहे. पण आयुष्य नेहमी तुम्हाला सर्प्राइज देत असते. गेली काही दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता किचनमध्ये स्थान मिळवण्यासाठी मी पदर खोचला आहे. मला कुकिंगची आवड पहिल्यापासूनच आहे. आता माझी ही आवड जगाशी शेअर करण्याची संधी मला मिळाली आहे. मास्टरशेफ इंडियाची सर्वात जेष्ठ स्पर्धक म्हणून मी जगाला हे दाखवून देणार आहे की, सळसळत्या तारुण्याइतकेच अनुभवाचे आणि सुजाणतेचेही मोल असते. कोणतेही आव्हान पुढे येऊ दे, मी झारे, पळ्या घेऊन सज्ज आहे!”
यांच्यातील कोणता कलाकार होस्ट फराह खानला प्रभावित करू शकेल आणि सेलिब्रिटी शेफ परीक्षकांचे मन जिंकू शकेल?
सेलिब्रिटी मास्टरशेफ, लवकरच येत आहे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!