ईव्हीएममध्ये पोग्रामिंग शक्य : पृथ्वीराज चव्हाण

Spread the love

पुणे : ईव्हीएममध्ये पोग्रामिंग शक्य आहे. जगातील प्रगत देशांमध्ये ईव्हीएमवर निवडणुका होत नाहीत. भारतात हट्टाने ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जात आहेत. भारतातील लोकशाही टिकावी, ही जगातील लोकशाही प्रेमी नागरिकांची इच्छा आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत आणि निकालाबाबत सामान्य नागरिकांच्या मनात संशयाचे वातावरण आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारने जनतेमधील संशय दूर केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केले.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा, आदरणीय श्रीमती सोनीयाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार रवींद्र घंगेकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे , माजी नगरसेविका लता राजगुरू, अविनाश बागवे, दत्ता बहिरट , सौरभ अमराळे, सदानंद शेट्टी, कैलास कदम आणि सप्ताहाचे आयोजक व माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यावेळी उपस्थित होते. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या

 पदमजी हॉल येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गर्दीत हा कार्यक्रम पार पडला.

पद असो नसो पण वीस वर्षे हा उपक्रम होत आहे. देशात असा कार्यक्रम होत नाही. याबद्दल मोहन जोशी यांचे अभिनंदन केले पाहिजे, असे उद्गार चव्हाण यांनी काढले. ते म्हणाले, देशातील लोकशाही आणि राज्य घटनेवा गंभीर धोका निर्माण झाला आहे. देशात लोकशाही आहे का , हा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाही देशात चढ उतार येतात. परंतु, सध्याचा निकाल आश्चर्यकारक आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली हे सिद्ध करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारची आहे. लोकशाहीचा खून झाला तर राज्य घटनेला अर्थ उरणार नाही. सामान्य लोकांचा विश्वास बसेल यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील.

सोनिया गांधींबद्दल ते म्हणाले, सोनियाजींनी पंतप्रधानपदाचा त्याग केला या क्षणाचा मी साक्षीदार आहे. १९९१ ला सोनिया गांधी यांनी केवळ इच्छा व्यक्त केली असती तरी त्या पंतप्रधान झाल्या असत्या. २००४ चा विजय सोनिया गांधींचा होता. त्यांच्या जाहीरनाम्यावर लोकांनी मते दिली. तरीही त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले नाही. माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा , मनरेगा हे कायदे आणि योजना ही सोनिया गांधी यांची दूरदृष्टी आहे. राष्ट्रीय  सल्लागार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम केले आहे.

पवार म्हणाले, सत्तेत बसलेले लोक भारतीय संस्कृतीचे  ठेकेदार नाहीत. सोनिया गांधींनी भारतीय संस्कृती जपली आहे. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर त्या देश सोडून गेल्या नाहीत. त्यांनी भारताची सेवा केली. आज महात्‍मा गांधी, पं. नेहरू , इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव सुरू आहे. त्याविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे.

जोशी म्हणाले,  सोनियाजी गांधी यांनी पंतप्रधान पदाचा त्याग केला याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २००४ सालपासून सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह काँग्रेसच्या वतीने साजरा करत असून यंदाचे २० वे वर्ष आहे. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. एकतर्फी निकालामुळे अस्वस्थता असली तरी काँग्रेसचा कार्यकर्ता जिवंत आहे. पुढील निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी तो तयार आहे. प्रथमेश आबनावे यांनी सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन दत्ता बहिरट यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *