पुणे : पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्ष काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांना शहरातील विविध खेळ प्रकारातील दिग्गज खेळाडूंनी आणि क्रीडा संघटनांनी गुरुवारी एकमुखी पांठिबा जाहीर केला. बागवे यांनी शहरात क्रीडा संस्कृती रूजविण्याचे महत्त्वाचे कार्य केले असून यापुढे त्यांच्या हातून क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण काम व्हावे, यासाठी त्यांना या निवडणुकीत जाहीर पाठिंबा देत असल्याचे विविध क्रीडा संघटना आणि मान्यवर खेळाडूंनी जाहीर केले.
पुणे शहर बॉक्सिंग संघटनेतर्फे भवानी पेठेतील लक्ष्मी बाजार सांस्कृतिक भवन येथे शहरातील खेळाडूंचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी रमेश बागवे यांच्या वतीने सत्कार स्वीकारला. शिवछत्रपती पुरस्कार विजेते रेनॉल्ड जोसेफ आणि सलमान शेख (बॉक्सिंग), जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्रदीप परदेशी, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ, संजय कांबळे (स्केटिंग), हर्षल निकम (अँथलेटिक्स), अनिल शिंदे (बॉडी बिल्डिंग), श्याम सहानी (पॉवर लिफ्टिंग), पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव अभिमन्यू सूर्यवंशी, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष मदन वाणी, राष्ट्रीय पुरस्कार विजेती सईद डावखर, समीक्षा सूर्यवंशी, भूमिका खिलारे, क्रीडा संघटक विजय उत्तुरे, सोफी असिफ ( कराटे), सुरेशकुमार गायकवाड, भगवान वायाळ (पॉवर लिफ्टिंग), इलियाज शेख (वेटलिफ्टिंग), किरण भिसे (बॉल्डी बिल्डिंग), प्रशिक्षक उमेश जगदाळे, यांच्यासह विविध खेळाडू आणि शंभर पालक उपस्थित होते.
बागवे यांनी महापालिकेतर्फे जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम, तसेच सुसज्ज व्यायामशाळा उभारली. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलाच्या उभारणीसाठी त्यांनी योगदान दिले. शहरातील बॉक्सिंगसह सर्व प्रकारच्या क्रीडा संघटनांच्या मागे ते कायम खंबीरपणे उभे राहिले आहेत. शहरातील क्रीडा संस्कृती घडविण्यात बागवे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, अशी भावना खेळाडूंनी व्यक्त केली.
लाडकी बहीण म्हणून महिलांना दीड हजार रुपये देण्यापेक्षा महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. महिला अधिकाऱ्यांना आणि पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण करणारे लोकप्रतिनिधी नको. सर्वसामान्य नागरिक आणि खेळाडूंना विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणारे आणि खेळाडूंच्या सदैव पाठीशी राहणारे रमेशदादा यांना मतदान करावे, असे आवाहन खेळाडूंनी केले. रमेशदादांचा खेळाडूंशी एखादी स्पर्धा आयोजित करण्यापुरता संबंध नसून ते सर्व खेळाडूंच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासाठी उभे राहतात. खेळाडूंनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशी भावना अविनाश बागवे यांनी व्यक्त केली. मदन वाणी यांनी सूत्रसंचालन केले. अभिमन्यू सूर्यवंशी यांनी आभार मानले.
तत्पूर्वी आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममधील साळवे यांच्या पुतळ्याला रमेश बागवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संगमवाडी येथील समाधी स्थळी पुष्पहार अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त नेहरू स्टेडियममधील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. वानवडी बाजार, गिरमे शाळा, कटके वस्ती, नेताजी नगर या भागात निघालेल्या रमेश बागवे यांच्या पदयात्रेचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.