Spread the love

शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देखाव्याचे उद्घाटन 

पुणे: एकाच देशातून एकाच वेळी बारा वास्तूंना हेरिटेजचा दर्जा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. महाराष्ट्रातील गड किल्ले हे केवळ शिवाजी महाराजांशी किंवा इतिहासाशी संबंधित आहेत असे नाही, तर महाराष्ट्र भूमीची ते ओळख आहेत. म्हणून त्यांना हेरिटेज दर्जा मिळणे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी व्यक्त केली.

शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्यावतीने यंदाच्या गणेशोत्सवात युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये समाविष्ट १२ किल्ल्यांची प्रतिकृती आणि त्यांचा इतिहास सांगणारी ध्वनी चित्रफीत असा देखावा सादर करण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेविका गायत्री खडके, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे, उपाध्यक्ष अनंत कावणकर, सचिव पराग ठाकूर, कार्याध्यक्ष कौस्तुभ गोखले, गिरीश सरदेशपांडे, महेश काटदरे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पराग ठाकूर म्हणाले, युनेस्को ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित केले आहे. त्यानिमित्त शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्यावतीने शिवजन्म ते शिवराज्याभिषेक असा प्रवास किल्ल्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. रायगड स्मारक मंडळ, कात्रज शिवसृष्टी आणि नारळकर इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने हा देखावा साकारण्यात आला आहे.

मोहन शेटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज किती महान होते हे आपल्याला माहित आहे, परंतु जगाला त्याचा परिचय नव्हता. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश झाल्यानंतर महाराजांचे कर्तृत्व जगाला कळले आहे. त्याचप्रमाणे शिवचरित्र सुद्धा जगभर पोहोचले पाहिजे. शिवाजी महाराजांची आठवण करून देणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती मेहुणपुरा गणेशोत्सव मंडळात साकारण्यात आल्या आहेत. हे गड किल्ले जिवंत शाहीर आहेत.