
मुंबई – ‘खालिद का शिवाजी’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी, तथ्यहीन व विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे. या विकृत प्रचारामुळे समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ज्याप्रमाणे ‘‘उदयपूर फाइल्स : कन्हैय्यालाल टेलर मर्डर’’ या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यावर अंतरिम बंदी आणण्यात आली, त्याचप्रमाणे ‘‘खालिद का शिवाजी’’ या चित्रपटावर देखील बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्य व केंद्र सरकारकडे केली आहे.
या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लिम सैनिक होते, महाराजांचे ११ अंगरक्षक मुस्लिम होते, आणि रायगडावर महाराजांनी मशिद बांधली होती, असे आक्षेपार्ह व विकृत दावे करण्यात आले आहेत. हे सर्व दावे भ्रामक, अप्रामाणिक व कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याविना प्रसारित करण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांनी धर्मनिष्ठ हिंदवी स्वराज्य उभारले. त्यांनी स्वतः आपल्या सावत्र भाऊ व्यंकोजी राजेंना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला आहे की, “तुर्क फौजेत ठेविले, मग जय कैसा होईल?” त्यामुळे या चित्रपटात शिवाजी महाराजांना ‘सेक्युलर’ ठरवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न इतिहासाच्या नावाने समाजात गोंधळ निर्माण करणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणतीही जातीय जनगणना नव्हती. अशा परिस्थितीत ३५% मुस्लिम सैनिक असल्याचा दावा कोणत्या आधारावर केला जात आहे? असा सवाल समितीने उपस्थित केला आहे.
जर मुस्लिम समाजाला खरेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम असते, तर पाच मुसलमान पातशाह्यांनी त्यांना संपवण्याचा चंग बांधला नसता किंवा छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले नसते. सध्याच्या काळातही जर मुसलमान समाजाला शिवाजी महाराजांप्रती आदर असता, तर यवत (ता. दौंड, जि. पुणे) येथे झालेल्या हिंसाचारात ‘सय्यद’ नावाच्या धर्मांध व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती फोडली नसती. त्यामुळे ‘‘खालिद का शिवाजी’’ हा चित्रपट हिंदू समाजात भ्रम निर्माण करणारा आणि शिवाजी महाराजांचे खोटे चित्रण करणारा आहे.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९(२) आणि भारतीय दंड संहिता कलम २९५ (अ) नुसार, “छत्रपती शिवाजी महाराजांचे विकृत चित्रण जनतेच्या धार्मिक भावना दुखावणारे, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे ठरू शकते.” पूर्वीही ‘पद्मावत’, ‘जोधा अकबर’ या चित्रपटांच्या वेळेस अशाच प्रकारच्या विकृत इतिहासामुळे जनक्षोभ निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावर जोपर्यंत त्यातील ऐतिहासिक माहितीचे अधिकृत सत्यापन होत नाही तोपर्यंत बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.