
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. या सिनेमात बॉलीवूड अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिका साकारत असून, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘छावा’मध्ये महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकत आहे.
सध्या सर्वत्र या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू असून, अनेक ठिकाणी ‘छावा’चे शो हाऊसफुल सुरू आहेत. याचदरम्यान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी या सिनेमासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नामदार पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्रातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी; यासाठी छावा सिनेमा मतदारसंघातील एक लाख नागरिकांना मोफत दाखविण्याचा संकल्प केला आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध मंडळांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी याबाबतची घोषणा केली.
नामदार पाटील म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज हे देखील आपलं दैवत आहे. धर्मासाठी त्यांनी आपलं बलिदान देऊन एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा हा प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे. त्यामुळे कोथरूड मतदारसंघातील किमान एक लाख नागरिकांना छावा सिनेमा मोफत दाखविण्याचा प्रयत्न आहे.” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढील पीढिमध्ये रुजावेत, यासाठी आगामी काळात मतदारसंघातील नागरिकांसाठी कात्रज आंबेगाव मधील शिवसृष्टीची मोफत सफर देखील आयोजित करणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.