पुणे, दि.१०: भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन लोकशाही सशक्त करण्याच्या उद्देशाने पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर दिव्यांगांना विविध सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कळविली आहे.
या विधानसभा मतदार संघात इआरओ नेट सॉफ्टवेअर नुसार २ हजार २५९ अस्थिव्यंग १४३ कर्णबधिर, २१८ अल्पदृष्टी व २ हजार ४८० इतर असे एकूण ५ हजार १०० दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांग मतदारांचे शंभर टक्के फ्लॅगिंग व मॅपिंग केल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत कळविण्यात आलेले २३२ अस्थिव्यंग, ४९ अल्पदृष्टी, ४९ कर्णबधिर व ५१ इतर असे एकूण ३९५ दिव्यांग मतदार आहेत. तसेच वय वर्ष ८५ वरील एकूण १० हजार ३११ मतदार आहेत. यामध्ये १०० वर्ष वरील एकूण २२६ मतदार आहेत.
कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअर्सची सुविधा दिव्यांग कक्षाचे नोडल अधिकारी नवनाथ चिकणे व त्यांच्या पथकाने विविध हॉस्पिटल्स, सामाजिक संस्था यांचे कडून जवळपास ११० व्हील चेअर्स उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदान केंद्रावर व्हीलचेअर साठी रॅम्प, तसेच दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवक, दुभाषक, मॅग्नीफाइंग ग्लासेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे व लोकशाही बळकटी करणेकामी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी केले आहे.