
सुखदा उपक्रमातील प्रथम महिलेस कन्या प्राप्ती
हिंदू धर्मात मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळेच नवरात्रोत्सव काळातही तिची मनोभावे पूजा केली जाते. तिच्या जन्मानंतर अनेक कुटुंबांमध्ये मोठा आनंद साजरा केल्याचे आपण नेहमीच पाहतो. असाच काहीसा आनंद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरु केलेल्या ‘सुखदा’ उपक्रमाचा भाग असलेल्यांना झाला आहे.
वास्तविक, आपल्याकडे गर्भसंस्काराला प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखाद्या महिलेच्या गर्भधारणेपासून सुदृढ आणि बुद्धिमान अपत्यप्राप्तीसाठी गर्भसंस्कार हा अतिशय आवश्यक मानला जातो. कारण याच काळात तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासोबतच बाळंतपणासाठी सक्षमपणे समोर जाता यावं. योग्य आहार, योग्य व्यायाम व सर्वासाठीचे समुपदेशन याची नितांत आवश्यकता असते.
पुण्यासारख्या महानगरात प्रत्येक कुटुंबाला हे शक्य असतं असं नाही. आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबात गर्भधारणेपासून ते प्रसूती हे मोठं दिव्यच असतं. बाळ येणार हा आनंद एका बाजूला आणि येणा-या बाळाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्याच्या जबाबदारीचा ताण एका बाजूला अशा द्विधा मनस्थितीतून पालक जात असतात.
त्यामुळे आर्थिक दुर्बल कुटुंबात जन्माला येणारं बाळ हे सुदृढ असावं; यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मतदारसंघामध्ये ‘सुखदा’ उपक्रम कार्यान्वित झाला. या उपक्रमाचा वस्ती भागातील असंख्य महिलांना लाभ होत आहे. आज याच उपक्रमात सहभागी सौ. रजनी दिघे या महिलेची प्रसूती दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात झाली. यावेळी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यामुळे याचा आनंद केवळ दिघे कुटुंबियच नव्हे; तर सुखदा उपक्रमाशी जोडलेला प्रत्येकजण व्यक्त करत आहेत.
या आनंदाच्या क्षणाबाबत सुखदा उपक्रमाच्या चेअरमन स्मीता पाटील म्हणाल्या की, आपल्याकडे मुलीला लक्ष्मीचं रुप मानलं जातं. तिच्या जन्माने प्रत्येक कुटुंबात भरभराट होत असते. आपल्याकडे गर्भसंस्कार हा अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. यातील गर्भसंस्काराचा अर्थच हा आहे की, गर्भातील बाळावर चांगले संस्कार करणे. त्यामुळे कोथरूडचे संवेदनशील आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘सुखदा’ हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाअंतर्गत गरोदर महिलांचे बाळंतपण सुखकर व्हावे; यासाठी तज्ज्ञांकडून समुपदेशन, गर्भवतीस पोषक आहार, प्रसूतीनंतर योग सराव; तसेच गर्भधारणेपासून ते प्रसूती औषधोपचाराचा खर्च यासर्व सुविधा मोफत करुन दिल्या आहेत आहे. तसेच, दैनंदिन तपासणीसाठी केळेवाडीत सुखदाचे अद्ययावत केंद्र सुरु करण्यात आले आहे. आज या उपक्रमाचा पहिला प्रसाद लक्ष्मीच्या रुपाने मिळाला आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद होत आहे.”
यावेळी सुखदा उपक्रमातील योग शिक्षिका मुग्धा भागवत, स्त्रीरोग तज्ज्ञा अपूर्वा देशपांडे, धनश्री चितळे, भाजपा नेत्या स्वातीताई मोहोळ, सुरेखा जगताप उपस्थित होते.