पुणे येथे बाल आनंद मेळावा संपन्न

Spread the love

दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहित करावे- दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी

पुणे, : शिक्षकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना त्या त्या क्षेत्रात प्रोत्साहित करण्यासह यशस्वी वाटचालीकरीता मार्गदर्शन करावे, असे आवाहन दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी यांनी केले.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे आदी उपस्थित होते.

श्री. पुरी म्हणाले, शासकीय व शासन अधिपत्याखालील आस्थापनेवर राखीव असलेल्या ४ टक्के जागांवर दिव्यांग उमेदवारांना नोकरी मिळण्यासोबतच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याकरीता शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत.

श्री. पाटील म्हणाले, कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कला व गुण बघितले असता तेही सर्वसामान्यापेक्षा कमी नाहीत. सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवण्याबाबत प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. देवढे यांनी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे महत्त्व, जिल्ह्यामध्ये दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था, दिव्यांगासाठी शासन स्तरावरून अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या योजना आदींची माहिती दिली.

यावेळी दिव्यांग मुलांच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांचे सनई चौघडा वादन, गणेश वंदना व मल्लखांब प्रात्यक्षिकद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रकला, अॅबिलिकपिक्स, कला, संगीत व क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या ४१ यशस्वी दिव्यांग विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

बाल आनंद मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील ८१ दिव्यांगाच्या विशेष शाळा व कर्मशाळातील ३ हजार २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *