
पुण्याच्या पुनीत बालन गृप यांच्या सहकार्याने लातूर शहरात प्रथमच सबज्युनियर्स अर्थात बाल गटाच्या म्हणजेच 13 ते 15 वयोगटातील राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि दि लातूर ज्यूदो असोसिएशनद्वारा आयोजित या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेसह राज्य निवड चांचणी स्पर्धांचे हे आयोजन असून यातील विजेते ज्यूदो फेदारेशनद्वारे आयोजित राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेमध्ये राज्याचे प्रातिनिधित्व करणार आहेत. दि. 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान बार्शी रोडवरील गिरवलकर मंगल कार्यालय येथे या स्पर्धांचा थरार लातुरकरांना अनुभवायला मिळणार असल्याची माहिती राज्य संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी राज्य ज्यूदो संघटनेचे महासचिव दत्ता आफळे,लातूर ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, सचिव आशिष क्षिरसागर, डॉ संपत साळुंके, डॉ. अविनाश वाघमारे यांची उपस्थिती होती.
राज्यातील जवळपास 31 जिल्ह्यातील 300 वर मुले आणि मुली या स्पर्धेमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. गतवर्षी या स्पर्धा पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजिल्या होत्या आणि या स्पर्धेत 291 मुले आणि मुली सहभागी झाले होतेतर या वर्षी 173 मुले 161 मुली यांनी २७ जिल्ह्यातून प्रवेशिका पाठविल्या आहेत असे राज्य संघटनेचे महासचिव दत्ता आफळे यांनी सांगितले. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, कोल्हापूर यांसह यवतमाळ, वर्धा, बीड, नांदेड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यांसह संघव्यवस्थापक व प्रशिक्षकतसेच राज्य संघटनेचे पदाधिकारी असे एकूण 450 वर पाहुणे लातूर शहरात दाखल होतील.दि. 22 ऑगस्ट रोजी मुलांची वजने होवून त्यांच्या स्पर्धा दि. 23 तारखेला सकाळी आठ ते स्पर्धा संपेपर्यंत घेतल्या जातील. मुलींची वजने 23 तारखेला आयोजिल्या असून त्यांच्या स्पर्धाना 24 ऑगस्ट रोजी सकाळी आठ पासून प्रारंभ होईल.
ज्यूदो महासंघाच्या प्रचलित नव्या नियमांनुसार 13 ते 15 वयोगटातील मुलांच्या नऊ आणि मुलींच्या नऊ अशा 18 वजनगटामध्ये स्पर्धकांच्या लढती होतील. प्रत्येक लढत तीन मिनिटाची असेल. यासाठी राज्यातील 25 तज्ञ पंचांची नियुक्ती तांत्रिक समितीद्वारे करण्यात आलेली आहे. या पंचांमध्ये चार आंतरराष्ट्रीय पंच, सहा राष्ट्रीय पंच तर उर्वरित राज्यस्तरीय पंच असून या सर्वांची भूमिका स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महत्वाची आहे. नाशिकचे योगेश शिंदे यांची स्पर्धाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिंदे यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये काम करण्याचा अनुभव असून नाशिक येथे ज्यूदो लीग स्पर्धेसह शालेय आणि खुल्या राज्य स्पर्धा आयोजनाचा व्यापक अनुभव पाठीशी आहे.
लातूर शहरात खुल्या ज्यूदो स्पर्धांचे प्रथमच आयोजन होत आहे. त्यामुळे लातूर ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रदीप देशमुख हे खेळाडू आणि पाहुण्यांच्या भोजन तसेच निवास व्यवस्थेच्या आयोजनावर लक्ष ठेवून आहेत. निवास भोजन आणि खेळण्याची एकछत्री व्यवस्था बार्शी रोडच्या पद्मावती पेट्रोल पंपाजवळील गिरवलकर मंगल कार्यालयात करण्यांत आलेली आहे. लातूर संघटनेचे सचिव प्रा. आशिष क्षीरसागर आणि त्यांचा चमू लातूर संघाच्या सरावासह स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या महिन्यापासून काम करत आहेत. यामध्ये प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी डॉ.अशोक वाघमारे, आर्थिक नियोजनासाठी डॉ. संपत साळुंखे, खेळाडूंची वाहतूक व निवास व्यवस्थेकरीता बाळासाहेब शेप, विष्णू तातपुरे त्याचबरोबर सर्व पंच कमिटी व तांत्रिक अधिकारी यांची व्यवस्था आशिष क्षीरसागर, भोजन व्यवस्था रंगनाथ अंबुलगे व मुकरम बंडेहे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.