
पुणे, : बालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम पुणे जिल्ह्यातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन घोडेगावचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगावअंतर्गत आश्रमशाळा मुख्याध्यापकांचीएक दिवसीय प्रकल्प ओळख व संवाद कार्यशाळा शासकीय इंग्रजी आदिवासी माध्यमिक इंग्रजी आश्रमाशाळा, घोडेगाव संपन्न झाली. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, सोनुल कोतवाल, शिक्षण विस्तार अधिकारी मालती रासकर, सुरेश घुरगुडे, शिवशंकर पांचाळ, प्राचार्य चंद्रकांत नायकडे उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, बालकांचे हक्क व संरक्षण या ध्येयाच्यादिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्युकेशन (ईश्यू) संस्थेने आदिवासी विकास विभागाच्या घोडेगाव प्रकल्प कार्यालयाच्या सहकार्याने शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा या ठिकाणी एक विस्तृत प्रकल्प-ओळख अभ्यासवर्ग आणि क्षमता-बांधणी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. या सत्रात मुख्याध्यापकासोबत बाल संरक्षणाच्या आवश्यक संकल्पना आणि कायद्यांवर लक्ष केंद्रित करून प्रशिक्षित करण्यात आले, असेही श्री. देसाई म्हणाले.
बालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा कार्यक्रमाचे प्रकल्प व्यवस्थापक राजीव थोरात यांनी प्रकल्पची विस्तृत माहिती व कार्यक्रम स्वरूप, विषय आणि कृती कार्यक्रम यांची मांडणी केली.