
यशवंतराव चव्हाण कलादालनात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे, छायाचित्रांचे अनोखे प्रदर्शन
पुणे : ‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा’ हे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, अस्तित्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलला आज (दि. 28) अनोख्या प्रदर्शनाने सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे, चित्रांचे तसेच छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन बालसाहित्यकार, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ल. म. कडू यांच्या हस्त झाले.
बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती, काव्यवाचन, नाट्यछटा सादरीकरण, कथाकथन, रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गणेशमूर्तींचे तसेच गणेशाच्या चित्रांचे प्रदर्शन या निमित्ताने कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण कलादालनात भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन रविवार, दि. 31 ऑगस्ट पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. श्रीनिवास अरविंद पतके यांच्या गणेशोत्सवातील छायाचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे.
उद्घाटन समारंभास संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, वृद्धी रिॲलिटीच्या प्रतिनिधी धनश्री फाटक, अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जायभाये, सातारकर स्टुडिओच्या प्रज्ञा सातारकर, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत, सहसंवाद पुणेच्या केतकी महाजन-बोरकर, छत्रपती संभाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपक्रमाचे कौतुक करून उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना ल. म. कडू म्हणाले, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढीस लागण्यास मदत होईल. मोठ्यांसाठी महोत्सव आयोजित केले जातात, परंतु शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी आयोजित केलेला गणेश फेस्टिव्हल हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरला आहे.
वृद्धी रिॲलिटीचे संचालक अमोल शहा, धनश्री फाटक यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात सुनील महाजन म्हणाले, ‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा’ या उपक्रमाअंतर्गत कोथरूड परिसरातील 30 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन, नाट्यछटा सादरीकरण, कथाकथन, रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या. काही शाळांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीची कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमांना विद्यार्थी तसेच शिक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल वैशिष्ट्यपूर्ण ठरावा यासाठी मुले तसेच पालकांसाठी फोटो कॉर्नर, गाणी, कवितांचे रेकॉर्डिंग करण्याची, शुभेच्छा देण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
फोटो ओळ : संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, अस्तित्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलचे उद्घाटन करताना ल. म. कडू. समवेत सुनील महाजन, धनश्री फाटक, डॉ. राजश्री जायभाये, प्रज्ञा सातारकर, सुरेश राऊत, केतकी महाजन-बोरकर, ज्योती मानकर आणि विद्यार्थिनी.